…अन् मनोरुग्ण बांगलादेशात परतला

ठाणे: अमली पदार्थाच्या अधीन होऊन मानसिक संतुलन बिघडलेल्या एका बांगलादेशी तरुणाच्या वर्तनात सुधारणा झाल्यानंतर ठाण्यातील मनोरूग्णालयातून त्याला स्वगृही पाठवण्यात आले. विमानात त्याने महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याने त्याला अटक करण्यात आली होती.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात आणलेल्या या तरुणावर एक वर्ष औषधोपचार, समुपदेशन ग्रुप थेरपी आणि सकारात्मक उपचार झाल्यावर नुकतेच पोलिसांच्या मदतीने त्याला बांगलादेशात पाठवले आहे.
बांगलादेशात राहणारा फैजल शेख (नाव बदलून) या युवकाला नशापानाची सवय जडली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये मस्कत-मुंबई-बांगलादेश या विमान प्रवासात नशेच्या धुंदीत विमानातील महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील भाषेत संभाषण केले होते. विमान कंपनीने याची गंभीर दखल घेऊन फैजल विरोधात सहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नशाधिन अवस्थेत असणारा फैजल पोलिसांना व्यवस्थित उत्तर देत नव्हता. त्याचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाशी संपर्क साधून फैजल याला उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर फैजलवर उपचार सुरू होते, अशी माहिती रुग्णालय समाजसेवा अधिक्षक श्रीषा कुळकर्णी यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून फैजल अमली पदार्थाचे सेवन करत होता. एखाद्या दिवशी नशा करायला मिळाली नाही की तो बेचैन होऊन वाटेल तसे वागत होता. त्यामुळे काहीसे मानसिक स्वास्थ बिघडलेल्या फैजलवर उपचार करणे रुग्णालयासाठी मोठे आव्हान होते. बांगलादेशी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणारा फैजल याच्यावर औषध, समुपदेशन व ग्रुप थेरपी, व्यवसाय उपचार वर्षभर सुरू होते.
बांग्ला देशातील राजदूत फैजल याचा शोध घेत असता, त्यांनी मनोरुग्णालयाशी चार महिन्यांपूर्वी संपर्क साधला. यावेळी फैजलमधील सुधारणा बघून पोलिसांच्या मदतीने त्याला नुकतेच बांगलादेशात पाठवले आहे.
मानसोपचार तज्ञ डॉ.आशिष पाठक, मनरोग तज्ञ परिचारिका स्मिता राणे, समाजसेवा अधीक्षक श्रीषा कुळकर्णी, डॉ.पायल सुरपाम, डॉ. प्रियतम दंडवते आदींनी अथक प्रयत्न केले
मनरोग तज्ञ परिचारिका, समाजसेवा अधीक्षक आणि व्यवसाय उपचार तज्ञ रुग्णांना चांगले उपचार देण्यासाठी परिश्रम करतात. रुग्ण चांगले होऊन घरी जाताना मानसिक समाधान मिळत असते, अशा भावना वैद्यकीय अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी व्यक्त केल्या.