बेकायदा बांधकामे आणि अस्वच्छतेवर करडी नजर ठेवा !

* आयुक्तांची अधिकाऱ्यांना सक्त ताकीद
* अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर ‘ठाणेवैभव’च्या बातमीचे कात्रण

ठाणे : शहरातील स्वच्छता आणि अनधिकृत बांधकामे याकडे पुढील तीन महिने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा अशी सक्त ताकीद ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माजिवडा नाका येथून जात असताना त्यांना घाणीचे साम्राज्य आणि अनधिकृत टपऱ्या आणि गाळे नजरेस पडले होते. त्यावरून त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. त्याचे वृत्त काल ‘ठाणेवैभव’मध्ये प्रसिद्ध होताच माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने माजिवडा नाका परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करून हा परिसर स्वच्छ करून घेतला.

दरम्यान महापालिका आयुक्त श्री. राव यांनी ‘ठाणेवैभव’च्या बातमीची दखल घेऊन त्या बातमीचे कात्रण महापालिका अधिकाऱ्यांच्या व्हाट्सॲप ग्रुपवर पाठवले. त्या कात्रणाखाली पुढील तीन महिने अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे असे सक्त आदेश दिले आहेत. शहरातील स्वच्छतेकडे मुख्यमंत्री श्री.शिंदे विशेष लक्ष देतात. बदलते ठाणे ही त्यांची संकल्पना असून तिला धक्का लागणार नाही, याची काळजी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.

माजिवडा गोल्डन डाईज नाक्यावरून भिवंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुकानांच्या बाहेर सामान ठेवून रस्ता अडवून व्यवसाय करण्यात येत होता. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार आज कारवाई करण्यात आली.

गॅरेज, प्लायवुडचे दुकान, भंगाराची दुकाने यांच्यावर कारवाई करतानाच, दुकानांबाहेर ठेवलेल्या वस्तूही जप्त् करण्यात आल्या. दुकानांबाहेरील अवैध शेड तोडण्यात आले. त्यासोबत, हातगाडी, फेरीवाले यांच्यावरही निष्कासन कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत, उपायुक्त (परिमंडळ ३) दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त अलका खैरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांच्यासह परिमंडळ तीन मधील कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

या कारवाईत, या कारवाईत लोखंडी पत्र्याचे सहा गाळे, सात टपऱ्या, सहा दुकानांच्याबाहेरील पत्र्याच्या शेड काढण्यात आल्या. सात हातगाड्या जप्त करण्यात आल्या. याचसोबत रस्त्यावर पडलेला कचरा, बांधकामाचा राडारोडा उचलून या परिसराची स्वच्छताही करण्यात आली. तसेच, अवैधपणे पार्किंग करण्यात आलेली वाहने हटविण्यात आली. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त दिनेश तायडे यांनी दिली.