भाषणात लादेनच्या दाखल्यामुळे ऋता आव्हाड येणार अडचणीत?

सत्ताधाऱ्यांकडून टीकेची झोड

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रबळ नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी मुंब्र्यात केलेल्या भाषणावरून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे.

शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी मुंब्र्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्वतः खासदार सुप्रिया सुळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून येणार होत्या. मात्र त्या या कार्यक्रमाला आल्याच नाहीत. तर ऋता आव्हाड यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. ओसामा बिन लादेन हा त्याच्या आईच्या पोटातून दहशतवादी जन्माला आला नसून समाजाने त्याला दहशतवादी बनवले, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावर सत्ताधाऱ्यांकडून ऋता आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठा आतंकवादी ओसामा बिन लादेन आणि माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांची तुलना केली असल्याचे आरोप आनंद परांजपे यांनी केला आहे. लादेनवर वक्तव्य करून ऋता आव्हाड यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. राष्ट्रवादीकडून लादेनवरील वक्तव्याचा तीव्र निषेध करत असल्याचे सांगत पोलिसांनी व्हिडिओ तपासून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली आहे.

ओसामा बिन लादेनचे उदाहरण देणं हा राष्ट्रद्रोह असून लादेन आणि कलाम यांची तुलना करणं हाच राष्ट्रद्रोह असल्याचे परांजपे यांनी सांगितले. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील ऋता आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. या संदर्भातलं उत्तर हे शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी द्यावं, त्यांची ही भूमिका जयंत पाटील, डॉ. राजेश टोपे यांना मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ही जी तुतारी लादेनच्या उदात्तीकरणासाठी वाजते त्याच्या संदर्भात भूमिका स्पष्टीकरण देऊन ती बंद करावी, अशी टीका त्यांनी केली आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे हे खपवून घेतलं जाणार नाही असे श्री. डावखरे यांनी सांगितले.

माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला गेला- ऋता आव्हाड
तिथं बसलेल्यांनी फक्त माझं ते एक वाक्य एडीट केलं आहे. आम्ही आमच्या मनातले विचार हे चॅनलच कोण बसलेय हे बघून बोलायचे का? असा प्रश्न ऋता आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. समोरच्या श्रोत्यांना मला हे असे सांगायचे होते. लादेन हा वाईटच होता, पण तो तसा का झाला हे वाचलं पाहिजे. रामायण वाचताना आपण रावणालाही वाचतो ना? रावण होता म्हणुन अख्ख रामायण घडलं नाहीतर घडलच नसतं. जे काही हल्ली चाललंय ते खुप चुकीचं असून माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला गेला, अशी प्रतिक्रिया ऋता आव्हाड यांनी दिली.