बदलापूर, अंबरनाथला मिळणार अतिरिक्त पाणी

उल्हास नदीतून अतिरिक्त सात दलघमी पाण्याचे आरक्षण मंजूर

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरासाठी उल्हास नदीतून अतिरिक्त सात दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे अंबरनाथमधील पाणी योजना मार्गी लागणार आहे. तर पाणी आरक्षणामुळे रखडलेली बदलापुरातील पाणी योजना मंजूर होणार आहे.

बदलापूर आणि अंबरनाथ शहराची पाणीपुरवठा व्यवस्था महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून चालवली जाते. बदलापूर शहराला उल्हास नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेज बंधाऱ्यातून पाणी पुरवले जाते. अंबरनाथ शहरालाही याच पाण्यातून काही भाग दिला जातो. अंबरनाथ शहराची लोकसंख्या पाहता अंबरनाथ पालिकेचे चिखलोली धरण शहराला सहा दशलक्ष लिटर पाणी देते. तर २० दशलक्ष लिटर पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अंबरनाथ शहराला पुरवले जाते. बॅरेज बंधाऱ्याची क्षमता सुमारे १३० दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यातील ७० दशलक्ष लिटर पाणी बदलापूर शहराला तर उर्वरित पाणी अंबरनाथ शहराला दिले जाते. मात्र दोन्ही शहरांची वाढती पाण्याची मागणी पाहता शासनाकडून २०५६ पर्यंत पुरेल इतक्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांसाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. यातील अंबरनाथ शहराच्या पाणीपुरवठा योजनेला गती मिळाली आहे. तर तांत्रिक बाबींमुळे बदलापूर शहरातील पाणी योजना रखडली होती.

यामध्ये नव्याने पाणी आरक्षण ही महत्त्वाची बाब होती. गेल्या आठवड्यात जलसंपदा विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला असून अंबरनाथ आणि बदलापूर शहरासह आयुध निर्माण कारखान्याला एकत्रितपणे सात दशलक्ष घनमीटर इतका वाढीव पाणीपुरवठा मंजूर केला आहे. बदलापूर शहरातील बॅरेज बंधाऱ्यातून बदलापूर शहरासाठी तर नाळिंबी येथील उल्हास नदीतून अंबरनाथ शहरासाठी ही पाणी उचल केली जाणार आहे. नव्याने मार्गी लागणाऱ्या पाणी योजनांमधून या पाण्याचा वापर करता येईल अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या वाढीव पाणी आरक्षणामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बदलापूर शहरासाठी अतिरिक्त पाच दशलक्ष घनलिटर पाणी मंजूर करण्यात आले होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हे पाणी मिळणार होते. मात्र त्यातील अवघे दोन दशलक्ष लिटर पाणी सध्या मिळाले आहे. त्यामुळे उरलेले तीन दशलक्ष लिटर पाणी कुठे अडले असा प्रश्न उपस्थित होतो आहे