महिला उद्योजिकांची ‘घे भरारी’

प्रदर्शनाचे दमदार उद्घाटन

ठाणे : ‘घे भरारी’ या फेसबुक ग्रुपने नवव्यावसायिकांना आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य प्रदर्शन ठाणे येथे आयोजित केले असून २७ सप्टेंबर २०२४ रोजी याचे उद्घाटन प्रसिद्ध व्यावसायिक, लेखिका, कवियत्री मंजिरी निरगुडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

२७, २८ आणि २९ सप्टेंबर २०२४ रोजी सीकेपी हॉल (समारोह बँक्विट द्वारा संचालित) येथे हे प्रदर्शन होणार असून सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत नागरिकांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन ‘घे भरारी’ समूहाचे संस्थापक राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी एदलाबादकर यांनी केले आहे. हे एक्झिबिशन ३ हॉलमध्ये असून येथे ठाणे, मुंबई, पुणे, इंदूर आणि नागपूरहून अनेक व्यावसायिक आले आहेत.

करोनाच्या काळात अनेक छोट्या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला होता. त्यातून वर येऊन छोट्या व्यवसायिकाना एक व्यासपीठ मिळावे यासाठी ‘घे भरारी’ समूहाची स्थापना झाली. यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असे काम चालते. पुणे, मुंबई, नाशिक येथे ‘घे भरारी’ची उत्कृष्ट प्रदर्शने होत असतात.

ठाणेमधील या प्रदर्शनाचे आयोजन सीकेपी सभागृहाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आयोजित करण्यात आले आहे. 80 पेक्षा जास्त छोटे व्यावसायिक आणि महिलांनी यामध्ये भाग घेतला आहे. यामध्ये नवरात्री आणि दिवाळीसाठी सजावटीच्या वस्तू, अत्युत्तम दागिने, विविध प्रकारचे कपडे, उत्तम परफ्युम्स, हटके असणाऱ्या कुर्ती, पर्सेस, हातमागाच्या वस्तू, कलाकुसरीच्या असंख्य वस्तू, हॅन्डमेड सोप्स, हस्तकलेच्या अनेक वस्तू, पिशव्या, खाद्यपदार्थ, सणांसाठी फराळ असे अनेक स्टॉल येथे बघायला मिळतील. येणाऱ्या अनेक सणांची तयारी आणि भेट वस्तू देण्यासाठी हे प्रदर्शन नक्की उत्साहवर्धक ठरेल यात शंकाच नाही.

या सर्व छोट्या व्यावसायिकांना आणि अनेक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या प्रदर्शनाला सर्वानी जरूर भेट द्यावी. बाहेर मार्केटमध्ये बघायला न मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या एक्सक्ल्युसिव्ह साड्या आणि कपडे येथे बघायला मिळतील.
गिफ्टिंगसाठी अनेक पर्याय येथे पहावयास मिळतील. उत्कृष्ट दर्जा, वाजवी किंमत आणि उत्तम व्यावसायिक हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. सर्व मुंबईकरांनी आवर्जून या प्रदर्शनास भेट द्यावी आणि आपल्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे मंजिरी निरगुडकर म्हणाल्या.

मराठी तरुणांमध्ये व्यवसायाची आवड निर्माण व्हावी म्हणून ठाणेकरांनी अवश्य भेट द्यावी, अशी इच्छा राहुल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. हे प्रदर्शन रविवारपर्यंत असून सर्वांनी अवश्य भेट द्यावी.