मुदतबाह्य खाद्य व सौंदर्यप्रसाधनांच्या गोदामावर पोलिसांचा छापा

सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील एका गोदामात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे मुदतबाह्य तसेच घातक असलेल्या सौंदर्य प्रसाधन आणि खाद्य साहित्यांचा मोठा साठा करून ठेवला जात होता. याबाबत भिवंडी पोलीस उपायुक्त डॉ.श्रीकांत परोपकारी यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर शांतीनगर पोलिसांच्या विशेष पथकाने नारपोली पोलिस ठाणे हद्दीतील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील गोदामावर छापा मारून तेथून सव्वा कोटी रुपयांचा मुदतबाह्य झालेला खाद्य व सौंदर्य प्रसाधने याचा साठा जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील सागर कॉम्लपेक्स येथील १२ हजार चौरस फुटाच्या तीन गोदाम असून तेथे साबरिया प्युचर वर्क्स प्रा.लि.या गोदामाचे मालक राजु अग्रवाल रा.सांताक्रुझ यांच्या गोदामात मुदतबाह्य झालेले खाद्य व सौंदर्य प्रसाधन यांचे जुने स्टिकर काढून नवे मुदत नमूद केलेले स्टिकर चीटकवले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपायुक्त डॉ श्रीकांत परोपकारी यांना मिळाली होती. त्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांना या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, शरद पाटील यांच्या पथकातील रिजवान सैय्यद, श्रीकांत धायगुडे, बन, रूपेश जाधव, प्रशांत बर्वे, मुके, सानप, अलिशा देख, धनश्री निकनके या पथकाने गोदामात छापा मारला असता तेथे गोदाम व्यवस्थापक जतीन राजेश शर्मा (२५) रा. बदलापूर, पश्चिम व सुरेश कल्पनाथ विश्वकर्मा (५२) रा.भिवंडी हे काम करताना आढळले. पोलिस पथकाने त्या ठिकाणी महागडे व सुप्रसिद्ध कंपनीचे साबण, शाम्पू, बॉडी स्प्रे, बॉडी लोशन, बाथरूम क्लिनर, बुस्ट, जाम असा मुदतबाह्य झालेला एक कोटी २५ लाख ८६,०२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून राजु अग्रवाल, राजेश शर्मा, सुरेश विश्वकर्मा या तिघा जणांच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून नोटीस बजावण्यात आली आहे.

गोदाम मालक हा सर्व मुदतबाह्य माल कोठून आणत होता व कोणाला विक्रीसाठी देत होता, याबाबत संपूर्ण माहिती गोळा करून त्याच्यावर योग्य ती कारवाई लवकरच केली जाणार असून शहरात अशी मुदतबाह्य साहित्य विक्री कोठे होत असल्यास त्याची माहिती पोलिस यंत्रणेस दिल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ.श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.