भीषण रिॲक्टर स्फोटात रासायनिक कंपनी बेचिराख

एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी

बदलापूर : औद्योगिक वसाहतीतील कंपनीतील कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटाच्या आवाजाने बदलापूरकरांची सकाळ सुरू झाली. एका कंपनीत झालेल्या स्फोटात कंपनी बेचिराख झाली असून परिसरातील एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

बदलापूर पूर्व मानकिवली एमआयडीसी येथील रेअर फार्मा या रासायनिक कंपनीत आज पहाटे साडेचारच्या सुमारास मिथेनॉल केमिकल रिऍक्टर प्रक्रिया होऊन, भला मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे कंपनीत मोठी आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तीन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या स्फोटात कंपनीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वेगात झालेल्या स्फोटामुळे कंपनीतील या ज्वलनशील रिऍक्टरचे लोखंडी भाग 500 मीटर अंतरावर उडाले आणि खरवई येथील रामबाग परिसरातील शिंगटे चाळ येथे राहणाऱ्या घनश्याम मेस्त्री यांच्या पायावर आदळून, त्यांचे पाय जळून निकामी झाले. तर, पत्नी धनश्री मेस्त्री आणि त्यांच्या तीन वर्षीय मुलीच्या पायाला देखील या घटनेत दुखापत झाली आहे.

सकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. बदलापूर अग्निशमन दल अधिकारी भागवत सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तीन तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. स्फोटानंतर कंपनीचा जवळजवळ सांगाडा उरला आहे. यावेळी कंपनीत चार कर्मचारी रात्रपाळीवर नोकरी बजावत होते. मात्र हे चारही कर्मचारी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ असल्यामुळे, ते सुदैवाने बचावले. परिसरातील नागरिकांनी मेस्त्री दाम्पत्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथील जे.जे रुग्णालयात पाठवले आहे.
त्यातच कंपनीतील रिॲक्टरचे इतर छोटे मोठे असे, दोन ते पाच किलो वजनाचे अनेक भाग चाळीतील अजून सात ते आठ घरांमध्ये पडले यात, नरेंद्र रेवाळे, मनोहर खैर, सुभाष घडवले, तसेच अन्य काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कंपनीतील स्फोटामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी तसेच या रासायनिक कंपन्या हटवण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.