ठाणे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली!

* ग्रामीण भागातील रस्ते, पूल पाण्याखाली
* धरणांमधून विसर्ग सुरू
* अनेक गावपाडे बाधित
* शेकडो कुटुंबे स्थलांतरीत
* आपत्कालीन यंत्रणा लागली कामाला

ठाणे : गेल्या काही दिवसांत ठाणे जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून जिल्ह्यातील काळू आणि उल्हास नद्यांनी इशारा आणि धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक गावे बाधित झाली असून शेकडो कुटुंबे स्थलांतरीत झाली आहेत. धरणेही ७० टक्के भरली असून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील रस्ते आणि पुल पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

आज ऑरेंज ॲलर्ट घोषित करण्यात आला होता. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम राहिला. ठाणे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. उल्हास नदीने बदलापूर, मोहने आणि जांभूळपाडा येथे धोका पातळी ओलांडली असून काळू नदीने टिटवाळा येथे धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. उल्हास नदीतून धोक्याची पातळी ओलांडल्याने कल्याण तालुक्यातील वरप, मोहने, वालधुनी, कल्याण, आणे भिसोळ, रायते, आपटी, दहागाव, मांजर्ली, अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ, बदलापूर, एरंजाड, कुडसावरे, कान्होर, कासगाव, उल्हासनगर तालुक्यातील शहाड, उल्हासनगर आणि म्हारळ तर भिवंडी तालुक्यातील दिवे आगार, अंजुर आणि रांजनोली अशी १९ गावे बाधित झाली आहेत. बारवी धरणात पाण्याचा येवा वाढत असून काही दिवसांत धरणाचे स्वयंचलित चक्रद्वारे उघडण्याची शक्यता आहे. परिणामी बारवी नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. त्यामुळे बारवी नदीकाठच्या विशेषतः अस्नोली, चांदप, चांदप पाडा, पिंपळोली, सागाव, पाटील पाडा, पादीरपाडा, कारंद, मोऱ्याचा पाडा, चोण, रहाटोली या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर भातसा नदी देखील सापगाव येथे इशारा पातळी ओलांडण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान मुरबाडमध्ये मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेलेले दोन तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना मुरबाडमध्ये घडली. डोंगरन्हावे येथील गणेश केणे व मुरबाड शेजारील दुधाळेपाडा-शास्रीनगर येथील ज्ञानेश्वर गोंधळी अशी पाण्यात वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत.

ठाणे-मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ६८४.६० दलघमी म्हणजे ७२.६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धामणी धरणात २३०.९४ दलघमी (८३.५७ टक्के) पाणीसाठा झाला असून ९३ घनमीटर प्रती सेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. अप्पर वैतरणा धरणात १७७८.६८ दलघमी (५३.९३टक्के) पाणीसाठा झाला आहे. मोडकसागरमध्ये १२७.१९ दलघमी (९८.६६टक्के) पाणीसाठा झाला आहे. तानसामध्ये १४३.८९ दलघमी (९९.१८ टक्के) पाणीसाठा झाला असून त्यातून ५९४.७२ घमी प्रती सेकंद वेगाने विसर्ग होत आहे. बारवी धरणात २०६.६७ दलघमी (६०.९९ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील जोरदार पाऊस आणि पूरस्थिती या पार्श्वभूमीवर तातडीच्या आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, दूरदृष्यप्रणालीद्वारे तर अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, तहसिलदार अभिजीत खोले, संजय भोसले हे प्रत्यक्ष उपस्थित होते. याशिवाय ठाणे जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेचे क्षेत्रीय वरिष्ठ अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.