बदलापूर: एका ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यावरून खाली घसरला, मात्र सुदैवाने रेल्वे रूळावर जाण्याआधीच ट्रक थांबल्याने मोठा अपघात टळला.
बदलापूर पूर्वेतील खरवईजवळ महावितरणचे स्विचींग स्थानक आहे. येथून औद्योगिक वसाहतीतून तुलसी सीटी या मोठ्या गृहप्रकल्पाकडे रस्ता जातो. गेल्या काही वर्षांपासून येथील रस्त्याची दुरावस्था झाली होती. येथील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मात्र मुख्य रस्त्यापासून पहिल्याच वळणापर्यंत हे रस्त्याचे काम केले. चौकापासून वळणावरून पुढे या रस्त्याचे काम रखडले.
ज्या रस्त्याचे काम रखडले आहे तो रस्ता मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत रेल्वेमार्गाला समांतर आहे. रस्ता आणि रूळांमध्ये अवघ्या काही फुटांचे अंतर आहे. येथील पथदिवे गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. याबाबत सातत्याने पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र त्यानंतरही पथदिवे बंद आहेत.
सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास येथून जाणाऱ्या एका ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने तो रूळाशेजारी असलेल्या भागावर जाऊन सरकला. सुदैवाने ट्रकवर नियंत्रण मिळवल्याने ट्रक रेल्वे रूळांवर जाण्यावाचून राहिला. हा ट्रक रूळांवर गेला असता तर मोठा अपघात होण्याची भीती होती. त्यामुळे कोणताही अपघात होण्यापूर्वी येथील रस्त्याचे काम पूर्ण करावे तसेच येथील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.