ठाणे: पावसाने उघडीप घेतल्याने घोडबंदर मार्गांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत ५० टक्के खड्डे बुजवण्यात आले असून पुढील तीन दिवसात या मार्गांवरील १०० टक्के खड्डे बुजवले जातील, असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
घोडबंदर मार्गांवर अनेक ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले होते त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत धरून गाड्या चालवाव्या लागत होत्या. खड्ड्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. हा मार्ग कोणाच्या ताब्यात आहे याचा विचार न करता खड्डे बुजविण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते त्यानुसार खड्डे बुजविण्याचे काम सुरु होते, परंतु मागील तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने कामात व्यत्यय आणला होता. रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन त्यांनी खड्डे त्वरित बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशाने काल संध्याकाळी ठाणे महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो आणि एमएसआरडीसीने या मार्गांवरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली असून काल मास्टिक पद्धतीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग आला आहे.
महापालिका आयुक्त श्री. राव यांनी स्वतः या कामाची पाहणी केली. पुढील तीन दिवसांत या मार्गांवरील सर्व खड्डे १००टक्के भरले जातील, असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत नगर अभियंता प्रदीप सोनग्रा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि महापालिका या मार्गांवरील खड्डे बुजवत होती. पावसामुळे थोडा वेळ लागला, पण कालपासून मास्टिकचे सहा लोड आले होते. त्याच्या साहाय्याने ५०टक्के खड्डे बुजविण्यात आले असून उर्वरित खड्डे पुढील तीन दिवसांत दुरुस्त केले जाणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना खड्डे विरहित रस्त्यावरून प्रवास करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.