शौचालयासाठी लुंगी आणि सॅन्डो बनियान आंदोलन

भाईंदर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष ॲड. विक्रम तारे-पाटील व कार्याध्यक्ष गुलाम नबी फारुकी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मीरा-भाईंदर शहरातील गणेश देवल नगरातील शौचालयाच्या गंभीर समस्येबाबत अनोखे आंदोलन करण्यात आले. लुंगी आणि सँडो बनियान परिधान करून त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. शेकडो लोकांसह आंदोलकांनी महापालिकेच्या मुख्य गेटवर जमून चार दिवसांत स्वच्छतागृहाची समस्या सोडविण्याची मागणी केली.

आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पालिकेच्या शौचालयाला टाळे ठोकून गणेश देवल नगरातील लोकांसाठी वापर करू, अशी धमकी विक्रम तारे-पाटील यांनी दिली. गुलाम नबी फारुकी यांनीही या समस्येचे गांभीर्य सांगून ते म्हणाले, “गरीब लोकांना शौचालयासाठी तीन-चार तास रांगेत उभे राहावे लागते. महिला, वृद्ध आणि लहान मुले ही समस्या कशी सहन करत आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एका शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. अनिकेत मानोरकर यांनी तात्काळ पथकाला पाचारण करून घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठवले व लवकरच तोडगा काढला जाईल व त्यांना कळविले जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष वंजाराणी नायडू, युवा अध्यक्षा माधवी ताई गायकवाड, अल्पसंख्याक अध्यक्ष अब्दुल तय्यब खान, प्रवक्ते श्याम रावत, वर्कर्स सेलचे अध्यक्ष बाबुराव भिल्लारे, प्रदेश प्रतिनिधी महादेव शिंदोलकर, सेवादलाचे अध्यक्ष नितीन केणी, जिल्हाप्रमुख जुनेद खान, जिल्हाध्यक्ष डॉ. मुख्याधिकारी हेमलता गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.