वारकऱ्यांची बस खड्ड्यात कोसळून पाच जणांचा मृत्यू

* मृतांमध्ये डोंबिवलीतील तिघांचा समावेश * बसमध्ये ५४ प्रवासी

ठाणे : डोंबिवली येथील घेसरगाव परिसरातील वारकरी भक्त खासगी बसने सोमवारी मध्यरात्री जात असताना नवी मुंबईत कळंबोलीपासून काही अंतरावर ट्रॅक्टरवर जाऊन आदळली आणि ४० फूट खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात ट्रॅक्टरमधील दोघांसह बसमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५४ वारकरी जयश्री ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने (एमएच-०२ एफजी-९९६६) पंढरपूरकडे जात होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेने जात असताना भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या ट्रॅवल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. पुढे ट्रॅव्हल्स अनिंयंत्रित होऊन थेट ३० ते ४० फूट खड्ड्यात जाऊन पडली.

ट्रॅक्टरवरील (एमएच 11 बीझेड 2286) चालक तरवेज सलाउद्दीन अहमद (28) राहणार उत्तर प्रदेश मुंबई पुणे महामार्गावर नो एन्ट्रीमध्ये पहिल्या लेनने ट्रॅक्टर चालवत घेऊन जात होते. यावेळी बसचालक संजय पाटील (54) हे आपल्या ताब्यातील बस मुंबई ते पंढरपूर चालवीत घेऊन जात असताना भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याचे नादात बसवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार ठोकर मारून अपघात झाला.

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून ४६ वारकरी जखमी झाले. यातील आठ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना कळंबोली येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. अपघातातील जखमींच्या वैद्यकीय उपचारावरील सर्व खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून पाच लाख रुपयांची देण्याचे त्यांनी जाहीर केले.