१३९३ दुकानांमध्ये तपासणी, चार लाखांचा दंड वसूल
ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील विविध प्रभाग समित्यांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी मोहिम तीव्र स्वरुपात राबविण्यात येत आहे.या मोहिमेनंतर्गत १५ दिवसांत जवळपास ८०३ किलो सिंगल प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या भरारी पथकाच्या माध्यमातून १,३९३ दुकानांमध्ये तपासणी करण्यात आली. सिंगल प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानदारांकडून एकूण चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग, प्रभाग समितीमधील अतिक्रमण तसेच निष्कासन विभागामार्फत संपूर्ण ठाणे शहरात सिंगल प्लास्टिकच्या विरोधात मोहीम सुरु करण्यात आली आहे.
सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा यासाठी सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी कारवाई तीव्र स्वरुपात राबविण्यात येत असून विक्रेत्यांकडे असलेला प्लॅस्टिकचा साठा जप्त करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सदरची कारवाई ही महापालिका कार्यक्षेत्रात नियमित सुरू राहणार असून नागरिकांनी देखील सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर करु नये असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
सोमवारी एका दिवसांत विविध प्रभाग समित्यांमध्ये करण्यात आलेल्या सिंगल यूज कारवाईत 288 आस्थापनांना भेटी देऊन एकूण २५१ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर ८१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली.