शरद पवार गट आक्रमक
ठाणे: मुंब्रा बायपास रस्त्याची बांधणी सदोष झाल्याने गेल्या काही वर्षांत अनेकांचे नाहक बळी गेले आहेत. याबाबत येत्या दोन दिवसांत तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात, अन्यथा येत्या १८ जुलै रोजी टोल नाक्याजवळ रस्ता रोखू, असा इशारा परिवहन समितीचे सदस्य शमीम खान यांनी दिला आहे.
मुंब्रा बायपास रस्त्यावर वारंवार अपघात होत असून अनेकांचे नाहक बळी जात आहेत. त्यामुळे हा बायपास नसून खुनी बायपास असल्याचा संताप शमीम खान यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात बाईक बायपासवरून खाली नागरी वस्तीत शिरून दोघांचे जीव गेले. यावेळी मृतांच्या कुटुंबीयांना आम्ही आर्थिक मदत करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे जन्मभराचे नुकसान कोणीच भरून देऊ शकणार नाही. अशावेळी साऱ्यांनीच एक होऊन संबंधित प्रशासनाला ठोस उपाय योजना करण्यास भाग पाडले पाहिजे, असे आवाहनही शमीम खान यांनी यावेळी केले.
बायपास मार्गावर ठाण्याकडून मुंब्र्याकडे जाताना संरक्षक भिंत बांधली भरण्याची गरज असून संबंधित ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे वेगाने येणारी वाहने नियंत्रण सुटल्याने नागरी वस्तीत जाऊन कोसळतात. यात नेहमीच जीवितहानी होत असते. याबाबत मी जिल्हाधिकारी आणि एमएमआरडीए प्रशासनाला पत्र दिले आहे. येत्या दोन दिवसांत उपाय योजना सुरू केल्या नाहीत तर राष्ट्रवादीचे नेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंब्रा कौसा येथील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने रस्ता रोखून प्रशासनाचे लक्ष वेधणार आहोत. यासाठी सर्व नागरिकांनी पक्षभेद विसरून आंदोलनात सामील व्हावे, असे आवाहनही शमीम खान यांनी केले आहे.