‘ठाणेवैभव’मध्ये वृत्त झळकले अन् मुख्यमंत्र्यांनी ठामपाला ‘खड्डा’सावले!

ठाणे: रस्ते कोणत्याही प्राधिकरणाचे असले तरी ठाणे महापालिकेने त्यावरील खड्डे बुजवावेत असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी ढकलल्याचे वृत्त ठाणेवैभवमध्ये झळकले. याची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना फोन करून संताप व्यक्त केला तर आयुक्तांनीही संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच खडसावले.

यापूर्वीच दिले घोडबंदरवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी झटकणाऱ्या ठाणे महापालिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलेच धारेवर धरले. होते. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील तशाप्रकारच्या सूचना दिल्या असताना ठाणे महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवण्याची जबाबदारी झटकल्याचे वृत्त दै.ठाणेवैभवने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालिका आयुक्तांना दूरध्वनी करून खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश दिले असून आयुक्तांनीही संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले असल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे.

रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ठाणे महापालिका, सार्वजनिक बांधकाम, आणि एमएसआरडीसी या तीनही यंत्रणांनी एक संघ म्हणून काम करावे असे निर्देश ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले असतानाही त्यांच्या निर्देशाला पालिका प्रशासनाकडून बगल देण्यात येत आहे. घोडबंदर मार्गावरील उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी आमची नसून संबधित प्राधिकरणाने खड्डे बुजवावेत अशी भूमिका घेत ठाणे महापालिकेने जबाबदारी झटकल्याचे वृत्त ठाणेवैभवने प्रसिद्ध केले होते. एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवले जात नसल्याने घोडबंदरला वाली कोण? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.

यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना दूरध्वनी करून रस्ते कोणाचेही असो खड्डे बुजवा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. यासंदर्भात कनिष्ठ अभियंता यांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशाप्रकारच्या भूमिकेवरून मात्र आयुक्तांनी या विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.

सोमवारी मात्र संबंधित विभाग खडबडून जागा झाला आणि घोडबंदर मार्गावरील खड्डे बुजवण्याचे कामं आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले.