पावसाने गतवर्षीचा विक्रम मोडला!

आतापर्यंत १२६९.७० मि.मी. पावसाची नोंद
ठाणे: ठाण्यात गेले तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने ठाणेकर गारव्याने सुखावले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या पावसाने गतवर्षीच्या पावसाचा विक्रम मोडला आहे. आजपर्यंत१२६९.७० मिमी पाऊस पडला तर २०२३ मध्ये याच कालावधीत १००१.६० मिमी पावसाची नोंद झाली होती.
शुक्रवारी रात्रीपासून जोर धरलेल्या पावसाने रविवारपर्यंत धुवाँधार बॅटींग केली आहे. या पावसामुळे वसंतविहार भागात दोन वृक्षांच्या पडझडीसह कापुरबावडी आणि मानपाडा येथील रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहनांचा खोळंबा झाला. तर, कसारा – सीएसएमटी लोकलमध्ये गळती झाल्याचा प्रकार सकाळी प्रवाशांनी अनुभवला. सुदैवाने, या पावसामुळे विशेष हानी झाली नाही, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.
हवामान विभागाने शनिवारी मुंबई-ठाण्यात पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी करून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार, शुक्रवारपासून रविवारपर्यंत २४ तासात १२७.१९ मिमी पाऊस कोसळला.
सकाळी कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये पावसामुळे गळती झाल्याचा प्रकार प्रवाशांनी अनुभवला. तर, घोडबंदर रोडवरील कापुरबावडी आणि मानपाडा परिसरात रस्त्यांवर जागोजागी पाणी तुंबल्याने अनेक वाहने खोळंबून पडल्याचे चित्र दिसले. वसंतविहार भागात दोन ठिकाणी वृक्षांची पडझड झाली.