उल्हास नदी दुथडी भरून; बारवीत समाधानकारक पाऊस

बदलापूर: गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यास आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नदीवर अग्निशमन दल सज्ज झाले आहे. दरम्यान उल्हास नदीचे पाणी ओसरू लागल्याची माहिती सायंकाळी प्रशासनाने दिली आहे.
उल्हास नदीची इशारा पातळी ही १६.५० व धोक्याची पातळी ही १७.५० अशी आहे. सायंकाळी उल्हास नदीच्या पाण्याची पातळी ही १६.१० वर आली असून, असाच पाऊस सुरु राहिला तर उल्हास नदी धोक्याची पातळी गाठेल अशी भीती बदलापूरकरांमध्ये निर्माण झाली होती. परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे. उल्हास नदीकिनारी अग्निशमन दलाने बोटी आणि संपूर्ण यंत्रणा तैनात केली असून, पूर परिस्थिती निर्माण झाली तर, सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बीएसयुपी इमारतीत सोय करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच नदीवर पाण्याची मजा लुटण्यासाठी आलेला नागरिकांना घरी परतण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याच बरोबर नदी लगतच्या गावांना व शहरातील, सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
बदलापूर शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बारवी धरण परिसरात समाधानकारक पाऊस पडत असून, आज सकाळपर्यंत बारवी धरणात 188 मिमी इतका पाऊस पडला असून, सध्याची बारवी धरणाची पाण्याची पातळी ही 62.10 मीटर इतकी आहे. त्यात ग्रामीण पट्ट्यात पावसाचा जोर जास्त असल्याने, बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे.