इमारतीचे प्लास्टर कोसळून दोघे जखमी

ठाणे: अनधिकृत इमारतीच्या सातव्या मजल्यावरील प्लास्टर कोसळून एकाच कुटुंबातील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना उपचारांसाठी ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी पहाटे ६.३६ च्या दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेने मात्र पुन्हा एकदा दिव्यात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दिवा पूर्व येथील केटी कॉम्प्लेक्स, नवीन प्लाझा या ठिकाणी तळ अधिक सात मजल्यांची अनधिकृत इमारत आहे. ही इमारत अवघी सात ते आठ वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. रविवारी पहाटे ६.३६ च्या सातव्या मजल्यावरील अरुण सिंग यांच्या मालकीच्या रूममधील बेडरूमच्या छताचे प्लास्टर कोसळले. यामध्ये अंकित सिंग (२८) यांच्या डोक्याला व उजव्या हाताला दुखापत झाली. तर सोनम सिंग (२६) त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दोघांनाही उपचारांसाठी पालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत सुदैवाने कुणाला जीव गमावावा लागला नसला तरी दिव्यातील सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.