ठामपा जबाबदारी घेईना; प्राधिकरणे खड्डे बुजवेनात !

ठाणे: रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ठाणे महापालिका, सार्वजनिक बांधकाम, आणि एमएसआरडीसी या तीनही यंत्रणांनी एकसंघ काम करावे, असे निर्देश ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले असतानाही त्यांच्या निर्देशाला पालिका प्रशासनाकडून बगल देण्यात येत आहे. परिणामी घोडबंदर मार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीने गंभीर स्वरूप धारण केले असून ठाणेकर बेहाल झाले आहेत.
घोडबंदर मार्गावरील उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी आमची नसून संबधित प्राधिकरणाने खड्डे बुजवावेत अशी भूमिका घेत ठाणे महापालिकेने जबाबदारी झटकली आहे. तर एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवले जात नसल्याने घोडबंदरला वाली कोण? असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे. त्यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे. संसाधने, मनुष्यबळ, रस्त्याची मालकी, कामाची जबाबदारी यापैकी कोणतीही अडचण त्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये स्वतः पालिका आयुक्त सौरभ राव यांनी रस्ते कोणाच्याही मालकीचे असले तरी मान्सून काळात हे खड्डे ठाणे महापालिका बुजवेल असे जाहीर केले आहे. मात्र पालिका आयुक्तांच्या भूमिकेत आणि आयुक्तांच्या निर्देशांची अंमलबजावणी करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या भूमिकेत तफावत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांत पावसाचा जोर कायम आहे. मात्र त्यापूर्वीच घोडबंदर उड्डाणपुलावर तसेच सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून ही वाहतूक कोंडी सोडवता-सोडवता वाहतूक पोलिसांची अक्षरशः दमछाक होते. कापूरबावडी, माजिवडा या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाघबीळ ते आनंद नगर पर्यंतच्या सेवा रस्त्यांवर देखील खड्डे पडल्याने या सरकारी यंत्रणांच्या असमन्वयामुळे वाहनचालकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.

ठाणे महापालिका हद्दीत एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम, एमएमआरडीए आणि स्वतः ठाणे महापालिकेचे रस्ते येतात. रस्ते कोणाचेही असले तरी, मान्सून काळात खड्डे बुजवण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेची आहे.
-सौरभ राव, आयुक्त, ठामपा

ठाणे महापालिका हद्दीत खड्डे नाहीत. प्रत्येक प्राधिकरण आपापल्या क्षेत्रातील खड्डे बुजवत आहेत.
-प्रशांत सोनग्रा,
शहर अभियंता, ठामपा