* पाच वर्षांत कार्यान्वित
* १२ मिनिटांत होणार प्रवास
* रोज एक लाख प्रवासी घेणार लाभ
ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडणारा आणि अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाला चालना मिळाली असून पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तब्बल १६,६०० कोटी एवढी प्रकल्पाची प्रशासकीय किंमत असून भारतातील हा सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग ठरणार आहे.
ठाण्याहून बोरीवलीकडे जाण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागतो. अशात घोडबंदर मार्गावर होत असलेल्या नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे इंधन, वेळ आणि पैशांचा अपव्यय होत असतो. यावर मार्ग काढण्यासाठी ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. या प्रकल्पाला आता चालना मिळाली आहे.
या प्रकल्पातील दोन्ही बोगद्यांमध्ये दोन मार्गिका अधिक एक आपत्कालीन मार्गिकेचे दोन अधिक एक बांधकाम असणार आहे. ११.८ किमी लांबीचा हा दुहेरी बोगदा ठाण्याच्या बाजूने सुरू होऊन बोरिवली येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.८ येथे संपेल. ३०० मिटर अंतरावर क्रॉस पॅसेजद्वारे बोगदे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. बोगद्यातील उंची ५.५० मिटर आणि व्यास १३.०५ मिटर असेल. बांधकामांचा कालावधी पाच वर्षे एवढा असून रोज एक लाख प्रवासी या बोगद्याचा वापर करणार आहेत.
या प्रकल्पाची एकूण लांबी ११.८ किमी असून त्यापैकी १०.२५ किमी बोगदा असून १.५५ किमी ॲप्रोच रस्ता आहे. या भुयारी मार्गासाठी भारतातील सर्वात मोठ्या टनल बोअरिंग मशीनचा वापर करण्यात येणार आहे. बोगद्याच्या आत काही अंतरावर अग्निशामक उपकरणे, पाणी नळी, स्मोक डिटेक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बोगद्याला हवेशीर होण्यासाठी नैसर्गिक किंवा यांत्रिक मार्गाने पुरेशा वायुविजन प्रणालीचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रवेशद्वारावर आणि आत प्रकाशित रेट्रो रिफ्लेक्टिव्ह एलईडी लाईट साईन फलक लावण्यात येणार आहेत.
या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास १२ किमीने कमी होऊन विनाथांबा आणि सिग्नलरहित १२ मिनिटांत होणार आहे. परिणामी घोडबंदर मार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होईल.
प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर प्रतिवर्ष दीड लाख मेट्रिक टन कार्बन उत्सर्जनात घट होईल. तसेच ध्वनी आणि वायू प्रदुषणातही लक्षणीय घट होणार आहे.