गर्दूल्ल्याची टीएमटी बसवर दगडफेक

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमली पदार्थ विरोधात एकीकडे भूमिका घेतली असताना आज सकाळी गजबजलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका गर्दूल्ल्याने टीएमटी बसवर दगड फेकल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी मात्र कोणतीच कारवाई केली नाही.

ठाणे स्थानकातील सॅटिस पुलावर सकाळी ११च्या दरम्यान प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बस चालकाला एका गर्दुल्ल्याने शिवीगाळ करत गाडीवर दगडफेक केली. यात गाडीच्या काचा फुटल्या. सुदैवाने या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही, परंतु एखाद्या प्रवाशाच्या डोक्याला किंवा डोळ्याला दगड लागून जखम झाली असती तर कोणी जबाबदारी घेतली असती असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला.

स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दूल्ल्यांचा असून या सर्वाना अमली पदार्थाचा पुरवठा कोण करतो हे पोलिसांना माहिती नाही का असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. रात्रीच्या वेळी देखिल हे गर्दुल्ले या भागात फिरत असतात. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात पोलिस धजावत नाहीत, असा देखिल आरोप काही प्रवाशांनी केला. अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली तरच अशा घटनांना आळा बसेल, असे देखिल प्रवाशांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.