अल्पवयीन मुलीचे अपहरण : कसारा पोलिसांविरोधात आमरण उपोषण

कसारा : येथील समतानगरमधील रहिवासी मिना शिंदे यांनी आपल्या अल्पवयीन मुलीचे पिंपरी घोटी येथील इसमाने अपहरण केल्याची तक्रार 27 मे 2024 रोजी कसारा पोलिसांत केली. मात्र आजपावेतो कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत पोलिस प्रशासनाविरोधात उपोषण सुरू केले आहे.

कसारा मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारपासून मीना शिंदे व सासू मंदा शिंदे यांनी या उपोषणास प्रारंभ केला आहे.

पिंपरी घोटी येथील मनोज कदम याने आपली अल्पवयीन मुलगी अश्विनी (17) हिस 26 मे रोजी पळवून नेली असल्याचे तक्रारीत म्हटले असताना व साधारणपणे दीड महिना होऊन देखील कसारा पोलिस तपासामध्ये दिरंगाई करत असल्याने त्रस्त झालेल्या मंदा शिंदे (सासू ),आणि मीना शिंदे (सून) यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

या उपोषणास स्थानिक शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला असून यावेळी उपोषणकर्त्याना खंबीरपणे साथ देण्यासाठी सेनेचे वरिष्ठ नेते चंद्रकांत जाधव, बंधू सोडनर, जयराम बेंडकुळे, शंकर भगत, बाळासाहेब भोसले, संतोष खैर, ऋषिकेश सांगळे, शशिकांत डोळस, सुखदेव शेखरे आदी सोबतीला होते.