ठाणे : अवैध वाळू उपसाविरोधात आज जिल्हा प्रशासनाच्या भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काल्हेर ते कोन येथील खाडीपात्रात कारवाई करून एक बार्ज, एक संक्शन जप्त करून ते नष्ट केले.
या कारवाईतील मुद्देमालाची अंदाजे किंमत 24 लाख असून, यासंबंधी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशान्वये व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे आणि उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या निर्देशानुसार आज 26 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजता काल्हेर ते कोन येथील खाडीपात्रात खारबाव मंडळ अधिकारी व भिवंडी मंडळ अधिकारी व त्यांच्या अधिनस्त तलाठी यांच्या मार्फत संयुक्त कार्यवाही करण्यात आली या कारवाईमध्ये एक बार्ज, एक संक्शन आढळून आले.
बार्जवरील कामगार पथकाची चाहूल लागताच पाण्यात उडी मारून पसार झाले. पळून जाण्यापूर्वी बार्ज वॉल काढण्यात आल्याने व बोटीच्या सहाय्याने ओढून आणणे शक्य नसल्याने तेथेच पाण्यात बुडवण्यात आला. एक सक्शन पंप बोटीच्या साहाय्याने काल्हेर बंदर येथे आणून खाडी किनारी काढून पुन्हा वापर होऊ नये म्हणून गॅस कटरच्या सहाय्याने कट करुन नष्ट करण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली.