कंत्राटी कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक नोंदणी सुरू

भ्रष्टाचार उघडकीस येण्याच्या भीतीने ठेकेदारांमध्ये खळबळ

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आल्याने विविध विभागातील कंत्राटी ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला चांगलाच चाप बसल्याची चर्चा पालिका परिसरात सुरू आहे.

अवघे १३८२ स्थायी कर्मचारी असलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेत कंत्राटी कर्मचारी सुमारे सहा हजारांच्या आसपास असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागातच सुमारे अडीच हजाराहून अधिक सफाई कंत्राटी कर्मचारी अनुक्रमे मे. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट सेस सर्व्हिसेस व मे. कोनार्क एंटरप्राइजच्या ठेक्यावर कार्यरत आहेत. वैद्यकीय आरोग्य विभाग, उद्यान विभाग, अग्निशमन विभाग, पाणीपुरवठा विभाग अशा विविध विभागासह कंत्राटी कनिष्ठ अभियंता, सुमारे ४५० सुरक्षा रक्षक मिळून हजारो कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची माहिती आस्थापना विभागाकडे उपलब्ध नाही.

प्रत्येक विभागप्रमुख आपल्या विभागातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची मासिक हजेरी एका कागदावर प्रमाणित करून दरमहा वेतनासाठी लेखा विभागासह लेखापरीक्षण विभागाकडे पाठवित असल्याने महापालिकेत एकूण कंत्राटी कर्मचारी संख्या गुलदस्त्यातच होती. या प्रकाराची माहिती आयुक्त संजय काटकर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आधारकार्डसह बायोमेट्रिक नोंदणी करण्याची सूचना सिस्टीम मॅनेजर यांना केली. मागील दोन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक नोंदणीनुसार आतापर्यंत सुमारे ३६८२ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. एकूण ४५०० कंत्राटी कर्मचारी मागणी असून सुमारे १५०० कंत्राटी कर्मचारी कार्यरत असल्याने बायोमेट्रिक नोंदणीनंतरच अधिकृत कंत्राटी कर्मचारी विभागवार कार्यरत असल्याची माहिती उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयुक्त संजय काटकर यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची अधिकृत संख्या उपलब्ध होणार असल्याने ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.