खड्डे दुरुस्तीचा आव; नालेसफाईचा बनाव

आ. संजय केळकर यांची उड्डाणपूल, रस्ते, सेवा रस्ते, नाल्यांची पाहणी

ठाणे : पावसाळ्यापूर्वी अपुरी झालेली रस्त्यांची कामे आणि नालेसफाई यामुळे पहिल्या पावसातच रस्त्यांवर खड्डे पडले असून नाले तुंबले आहेत. सध्या केलेली खड्डे भरणी ही तात्पुरती असून येत्या पावसात पुन्हा खड्डे पडतील. पावसाळापूर्व कामांचा हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला.

आमदार संजय केळकर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत आज माजिवडे, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ येथील उड्डाणपुलांवरील खड्डे दुरुस्तीची पाहणी केली. सध्या भरण्यात आलेले खड्डे ही वरवरची मलमपट्टी असून येत्या पावसाळ्यात पुन्हा खड्डे पाडण्याची भीती आमदार केळकर यांनी व्यक्त केली. सहा महिन्यांपूर्वी विशेष पद्धतीने खड्डे भरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. पण तरीही पुन्हा खड्डे पडलेच. त्यामुळे ठाणेकरांच्या पैशांची निव्वळ लूट होत असल्याचा आरोप श्री. केळकर यांनी केला.

सेवा रस्ते देखील दुकाने, गाळे, शो रूम यांच्या वाहनांनी अडवले गेले आहेत. खड्ड्यांमुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असताना वाहनचालकांना सेवा रस्त्यांवरही तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे सेवा रस्ते कठोर कारवाई करून मोकळे करावेत, अशी मागणी श्री केळकर यांनी केली.

नालेसफाईचे देखील या पाहणी दौऱ्यात पितळ उघडे पडले. अनेक नाल्यांची अद्याप सफाईच झाली नसल्याचे यावेळी उघडकीस आले. अमारा लोढा कोलशेत येथील नाला प्रचंड तुंबल्याने तो जणू रस्ताच असल्याचा भास होत होता. अर्धवट नाले सफाईमुळे अनेक ठिकाणी रहिवाशांचे येत्या पावसात हाल होण्याची शक्यता व्यक्त करत या प्रकरणी कंत्राटदारांवर देखील कारवाई करण्याची मागणी श्री. केळकर यांनी केली. पावसाळ्यात नाल्यांलगतच्या परिसरात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वर्षातून दोनदा नाले सफाई करावी अशी सूचना प्रशासनाला केली होती, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे ते म्हणाले.

या पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांच्याबरोबर परिवहन सदस्य विकास पाटील, सीताराम राणे, सचिन शिनगारे, हेमंत म्हात्रे, जितेंद्र मढवी, राजेश गाडे आदी उपस्थित होते.