भिवंडी तालुक्यातील शासकीय जागांवर २४०५ अनधिकृत बांधकामे

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शासकीय आणि गुरुचरण जागेवर २४०५ अनधिकृत बांधकामे झाली असून याबाबत कारवाईसाठी स्थानिक राजकारणी आणि ग्रामपंचायत प्रशासन पुढाकार घेत नसल्याने दिवसेंदिवस अशा कामांमध्ये वाढ होत आहे.

भिवंडी तालुक्यातील ६० ग्रामपंचायती एमएमआरडीएमध्ये समाविष्ट झाल्याने ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामांनी जोर धरला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून ना हरकत दाखल घेऊन खाजगी जागेवर गोदामे बांधले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी विकासकांना हाताशी धरून अनधिकृत गोदामे बांधली असून अशा गोदामांवर कारवाईकरीता नेहमी जिल्हाधिकारी कार्यालय ते विधानसभेत केवळ चर्चा होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कारवाई होत नाही. काही जणांनी खाडीतील कांदळवनामध्ये भराव टाकून अनधिकृत गोदामे बांधली आहेत. अशी कमकुवत गोदामे पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना देखील यापूर्वी ग्रामीण भागात घडल्या आहेत.

सध्या तालुक्यात ठाणे, कल्याण आणि नाशिक रोड भागातील ग्रामीण भागात शेतीचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांकडे जनावरे राहिलेली नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील गुरचरणे ओस पडली. त्यावर राजकीय आणि प्रशासकीय लोकांच्या अशिर्वादाने अतिक्रमणे झाली आहेत. अशी तालुक्यात एकूण २२७५ अतिक्रमणे झाली आहेत. तर शासकीय जागेवर १३० अतिक्रमणे करून त्यावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे तहसील कार्यालय अंतर्गत खाजगी जागेवर ७२ अनधिकृत बांधकामे झाली आहेत. तसेच एमएमआरडीए क्षेत्रात खाजगी आणि शासकीय जागेवर मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामे झाली असून कोणी तक्रारी केल्या तरच एमएमआरडीए कार्यालयाकडून कारवाई होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

एमएमआरडीएचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटल्याचे काही दिवसांपूर्वी स्वतः लोकप्रतिनिधींनी सोशल मीडियातून दाखवून दिले. त्यामुळे आता तरी एमएमआरडीएचे पथक ही अनधिकृत बांधकामे तोडणार काय? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

दरम्यान तालुक्यातील ५२५ अनधिकृत बांधकामांवर एमआरटीपीनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती स्थानिक तहसील कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

भिवंडी तालुक्यातील गुरुचरण व शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम झाले आहे. पावसाळ्यात नागरिकांना बेघर करता येत नाही. पावसाळा संपल्यानंतर कायदेशीररित्या अशाप्रकारे अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल. मात्र एमएमआरडीए क्षेत्रातील खाजगी अनधिकृत बांधकामांवर एमएमआरडीए प्रशासन कारवाई करील, अशी माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली.