फाउंटन हॉटेल ते गायमुख रस्ता होणार आठ पदरी

ठाणे: मीरा-भाईंदर हद्दीतील फाउंटन हॉटेल ते गायमुखपर्यंत भविष्याचा विचार करून रस्ता दुप्पट रुंद होणार आहे. हा रस्ता ६० मीटर रुंद करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती व ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्य केली आहे. आमदार सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर, नगररचना विभागाचे पुरुषोत्तम शिंदे, महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबीत, एमएमआरडीएचे विनायक सुर्वे व इतर अधिकारी सोबत होते.
एमएमआरडीएच्या माध्यमातून हा रस्ता विकसित केला जाणार असून पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांना याबाबतचा अहवाल दिला जाणार आहे. सर्व प्रक्रिया करून पावसाळ्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.
ठाणे-घोडबंदर-भाईंदर या रस्त्यावर वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत असून भविष्याची गरज लक्षात घेता या रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. फाऊंटन हॉटेल ते गायमुखपर्यंत रस्ता सध्या ३० मीटर इतका आहे. सध्याची व भविष्याची गरज ओळखून हा रस्ता दुप्पट म्हणजे ६० मीटर इतका रुंद केला जावा अशी आमदार सरनाईक यांची मागणी आहे. फाउंटन हॉटेल ते गायमुखपर्यंत सध्या चार पदरी रस्ता आहे. भविष्यात रुंदीकरण झाल्यावर आठ पदरी होणार आणि त्याचा लोकांना मोठा फायदा होईल असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.
फाउंटन हॉटेल ते गायमुखपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यासाठी जमीन संपादित करावी लागेल. त्यात 90 टक्के खासगी जमीन आहे. ही खासगी जमीन मोबदला देऊन संपादित करावी लागणार आहे तर १० टक्के जमीन वन खात्याची असून ही सर्व आवश्यक जमीन संपादित केल्यास ६० मीटर रस्ता प्रत्यक्षात येऊ शकणार आहे, असेही आमदार सरनाईक म्हणाले.
ठाण्याच्या कापूरबावडीपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. तेथून गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या कडेला तीन मीटर जागेत सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे. ठाणे ते फाउंटन हॉटेल दरम्यान १० किलोमीटरचा सायकल ट्रॅक बनवला जाणार आहे, अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली.
गायमुख ते फाउंटन हॉटेल म्हणजेच काशीमीरापर्यंत मेट्रो आधीच मंजूर झाली आहे. त्यामुळे या मार्गावर डबलडेकर पूल असेल. वरच्या पुलावरून मेट्रो तर खालच्या पुलावरून वाहने धावणार आहेत, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.