चिखलोली धरणात आठ दिवस पुरेल एवढा जलसाठा

अंबरनाथ : यंदा काहीशा लांबलेल्या पावसामुळे अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण आटले आहे. पुढील आठ दिवस पाणी पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे, त्यामुळे पाऊस पडेपर्यंत अंबरनाथकराना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

अंबरनाथच्या चिखलोली धरणातून दररोज सहा एमएलडी पाणीपुरवठा वितरित करण्यात येतो. शहराच्या पूर्व भागातील अंदाजे 50 हजारपेक्षा अधिक लोकवस्तीला पाणी वितरित केले जाते. चिखलोली धरणाची उंची अडीच मीटरने वाढवण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून प्रक्रिया करण्यात राबवण्यात येत आहे. त्यासाठीचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. चिखलोली धरणाची उंची अडीच मीटरने वाढल्यास संपूर्ण अंबरनाथ पूर्व भागातील पाणीप्रश्न संपुष्टात येणार आहे, असे असले तरी मात्र अंबरनाथ पूर्व भागावर जलसंकट गडद होत आहे.

यंदा मान्सून सुरू झाल्यापासून अंबरनाथ तालुक्यात पावसाने केवळ हजेरी लावली आहे. त्यामुळे चिखलोली धरणातील पाणी कमी झाले आहे. दिवसाआड पाणी पुरवठा केल्यास 15 दिवस धरणातील पाणी पुरु शकणार आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होणे अपेक्षित आहे.