वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास मार्गी?

निविदा लवकरच खुल्या होणार

ठाणे : तीन कंपन्यांनी तांत्रिक निविदा सादर करत ठाण्यातील वर्तकनगर पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी उत्सुकताच दर्शविली आहे. त्यामुळे वर्तकनगर पोलीस वसाहतीचा रखडलेला पुनर्विकास अखेर आता मार्गी लागणार आहे, अशी चिन्हे दिसत आहेत.

या रखडलेल्या पुनर्विकासासाठी काढण्यात आलेल्या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे सूत्रांकडून कळते. वर्तकनगर येथे म्हाडाकडून सन 1973 मध्ये पोलीस वसाहत उभारण्यात आली. त्यातील घरे पोलिसांना देण्यात आली होती.

या वसाहतीतील इमारती जर्जर झाल्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासाची मागणी ब-याच महिन्यांपासून होऊ लागली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी या इमारती रिकाम्या करून इमारतींचे पाडकाम करण्यात आले आहे. दरम्यान, कोकण मंडळाने हा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेत प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणी केली मात्र आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प अव्यवहार्य ठरत असल्यामुळे पुनर्विकास रखडला होता. मात्र विकास करणे आवश्यक असल्यामुळे शेवटी प्राधिकरणाच्या अलिकडच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

हा प्रकल्प व्यवहार्य ठरवण्यासाठी कोकण मंडळाला उपलब्ध होणा-या हिश्श्यातील भूखंडावर घरे बांधण्याऐवजी भूखंडाचा ‘ई लिलाव’ करण्याचा निर्णय घेतला होता. कदाचित, या निर्णयामुळे प्रकल्पाचा खर्च वसूल होणार आहे, अशी वरवरची चर्चा प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिका-यांमध्ये सुरु झाली.

कोकण मंडळाच्या प्रस्तावानुसार या प्रकल्पात पोलिसांसाठी 538 चौरस फुटांची 380 घरे बांधण्यात येणार आहेत आणि चार दुकानांचे पुनर्वसन करुन, येथील दोनशे झोपड्यांचेही पुनर्वसन करण्यात येणार आहे आणि एक पोलीस ठाणेदेखील बांधून देण्यात येणार आहे.

या पुनर्विकासासाठी 400 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अशा या पुनर्विकासासाठी मार्चमध्ये कोकण मंडळांनी निविदा मागविल्या होत्या. नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या होत्या आणि तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिका-याने दिली. त्यातील एका कंपनीची आर्थिक स्थिती स्थिर असून दोन कंपन्यांची नावे आणि त्यांची आर्थिकता समजू शकली नाही.