ठाणे: स्थावर मालमत्ता विभागाच्या अखत्यारीतील मालमत्ता वाटप करण्यात प्रचंड अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थावर मालमत्ता विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेले दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडदे यांच्यावर भाजपा पदाधिकाऱ्याने केला आहे. तसेच अनधिकृत बांधकामांना देखील पाठीशी घातल्या प्रकरणी उप मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तक्रार केली आहे. याबाबत ठामपाकडून चौकशीचा फार्स सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडदे यांच्याकडे स्थावर मालमत्ता विभागाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. पुनर्वसनासाठी घरे आणि गाळे वाटप, भाड्याने घरे देणे आदी कामे या विभागामार्फत होतात. दिवा येथे भारत गिअर कंपनीसमोर असलेल्या एमएमआरडीएच्या इमारतींमधील घरे कोणतीही मान्यता ना घेता वाटप करण्यात आली असून यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शादाब हैदर यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात केला आहे. घोडबंदर मार्गावरील एका इमारतीत महापालिकेची मालमत्ता असलेल्या सभागृहही हडप होण्याची भीती त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. अशा अनेक मालमत्तांचे वाटप करताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही हैदर यांनी केला आहे.
दरम्यान दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून त्यांना पाठीशी घालण्याचे काम गुडदे यांनी केले असल्याचा आरोप हैदर यांनी केला आहे. याबाबत केलेल्या अनेक तक्रारीनंतर आयुक्त सौरभ राव यांनी केलेला पत्र प्रपंच म्हणजे निव्वळ दिशाभूल असल्याचा आरोपही हैदर यांनी केला आहे. श्री. गुडदे यांच्याकडून खुलासा आयुक्तांनी मागवला आहे. वास्तविक एखाद्या अधिकाऱ्याची चौकशी करताना त्या अधिकाऱ्याला पदावरून हटवणे गरजेचे असते, अन्यथा तो चौकशीवर पदाचा गैरवापर करून प्रभाव पाडू शकतो, असे मत हैदर यांनी उप मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात मांडले आहे. मात्र आयुक्त राव यांनी मंत्रालय स्तरावर कारवाई दाखवण्यासाठी चौकशीचा फार्स केला आहे. त्यामुळे शासनाने श्री.गुडदे यांना पुन्हा सेवेत बोलावून घ्यावे आणि महापालिकेने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी श्री.हैदर यांनी केली आहे.
याबाबत अक्षय गुडदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
आगामी अधिवेशनात लक्षवेधी वादळी ठरणार
स्थावर मालमत्ता विभागातील श्री. गुडदे यांच्या काळातील भ्रष्टाचार आणि दिवा प्रभागातील सुरू असलेली शेकडो अनधिकृत बांधकामे यावर आगामी पावसाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्न उपस्थित करून वादळी चर्चा घडवून आणणार आहेत. त्या निमित्ताने महापालिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार असल्याचे बोलले जात आहे. श्री गुडदे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यासाठी या प्रकरणात महाविकास आघाडीही आंदोलन करणार असून ठाण्यात महायुतीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कळते.