ठाणे: ठाणे शहरातील अवजड वाहतुकीची डोकेदुखी दूर करत घोडबंदर मार्गाला कोंडीमुक्त करणार्या प्रस्तावित कोस्टल मार्गाला आता सायकल ट्रॅकचीही जोड मिळणार आहे.
गायमुख-खारीगाव या सुमारे १३ किमी कोस्टल मार्गाच्या दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक उभारण्याचा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मांडलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे या मार्गाची निर्मिती करताना दुतर्फा सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. सायकल प्रेमींसाठी ही पर्वणी असणार असून प्रदूषणमुक्तीसाठी हे एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
बहूचर्चित गायमुख-खारीगाव कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाचा अहवाल ठाणे महापालिकेने तयार केला आहे. सुमारे १३ किमी अंतर असलेल्या या कोस्टल रोडसाठी दीड ते दोन हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे काम एमएमआरडीए करणार असली तरी यामध्ये भुसंपादनापासून विविध परवानग्या घेण्यापर्यंत महत्वाची भूमिका ठाणे महापालिका पार पाडत आहे. वनविभाग, खाडी किनारा, वायूदल, पर्यावण विभाग अशा विविध स्तरांवरील परवानग्या घेण्यात त्यामुळे यश आले आहे.
कोस्टल रोडचा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होणार आहे. पण या कोस्टल रोडची निर्मिती पर्यावरणाच्या सानिध्यात होणार असल्याने त्याचा सामान्य नागरिकांनाही उपयोग व्हावा असे धोरण ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांचे आहे. मात्र हलक्या वाहनांचा विचार न करता त्यांनी या ठिकाणी सायकलसाठी विशेष ट्रॅकची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या टप्प्यातील गायमुख ते कोलशेत हा मार्ग दुसर्या टप्प्यात पारसिक खारीगावला जोडला जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम करताना कोस्टल मार्गावर दुतर्फा तीन मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक उभारण्याचा प्रस्ताव आयुक्त सौरभ राव यांनी एमएमआरडीएकडे मांडला होता. त्यानुसार साडे तेरा किलोमिटर अंतरासाठी सर्वसहमतीने सायकल ट्रॅकला मंजूरी देण्यात आली.
मात्र या ठिकाणी पाच किलोमिटरचा उन्नत मार्ग असल्याने तेथे सायकल ट्रॅक उभारण्यासंदर्भात शंका व्यक्त करण्यात आली. पण आयुक्तांनी सर्व शंकांचे निरसन करत सायकल ट्रॅकसाठी जोर लावला. त्यामुळे आता उन्नत मार्गावरही सायकल ट्रॅक उभारण्यात येणार असल्याने या मार्गावर सायकलने प्रवास करता येणार आहे.
ठाणे पालिका क्षेत्रामध्ये सायकल चळवळ उभी रहावी यासाठी काही वर्षांपूर्वी सायकल स्टँड उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी सायकल स्टँड उभारून पालिकेने सायकलही उपलब्ध करून दिल्या होत्या. सध्या ते स्टँड व सायकल दोन्ही भंगारात पडले आहेत. त्यानंतर पालिकेने शहरात अनेक ठिकाणी सायकल ट्रॅक उभारले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शहरात सर्वात मोठा सायकल ट्रॅक उभारण्याचा ड्रीम प्रोजेक्ट आयुक्त सौरभ राव यांचा आहे. त्यासाठी कोस्टल रोड हा उत्तम पर्याय असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हा प्रस्ताव मांडला आणि मंजूरही करून घेतला. त्यामुळे भविष्यात ठाणेकरांना शहरात सर्वात मोठा सायकल ट्रॅक उपलब्ध होणार आहे.
विविध परवानग्यांमुळे गेली १५ ते २० वर्षे हा प्रकल्प केवळ कागदावरच होता. त्याुमळे ३० कोटींच्या या प्रकल्पाने आता हजारो कोटी खर्चांचा टप्पा गाठला आहे. असे असले तरी ठाणे शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
सायकल ट्रॅकची वैशिष्ट्ये
ठाण्यात सायकल प्रेमींची संख्या अधिक आहेत. सकाळ, संध्याकाळ व्यायाम म्हणून सायकलने फेरफटका मारणारे हौशीही आहेत. त्यांना याचा उपयोग होणार आहे.
कोस्टल रोडवर अवजड वाहने जाणार असल्याने बॅरेकेट्स टाकून सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे.
१३ किलोमिटर लांबीच्या या मार्गाला जोडून १०-१० फूट जागा सायकल ट्रॅकसाठी सोडण्यात येणार आहे.
येण्या-जाण्यासाठी दोन्ही बाजूने सुमारे तीन मीटर इतकी प्रशस्त जागा सायकलसाठी मिळणार आहे.