लाच घेऊन उपअधिक्षकांना धक्का मारून पोलिसदादा पळाला

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या भिवंडी-निजामपुरा पोलीस स्टेशनच्या नेमणुकीतील पोलीस नाईक निळकंठ खडके यांनी लाचेची रक्कम स्वीकारली. दरम्यान लाचलुचपत विरोधी पथकाला पाहून खडके यांनी उप अधिक्षकांना धक्का देऊन ते लाचेच्या रकमेसह पळून गेले आहेत.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने 10 जून 2024 रोजी पडताळणी केली असता लोकसेवक खडके यांनी तक्रारदार यांच्याकडून तीस हजार रुपये लाचेची मागणी केली आणि तडजोडीसाठी अंतिम रक्कम 29 हजार रुपये स्वीकारणार असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार ठाणे युनिटने 11 जून 2024 रोजी सापळ्याचे आयोजन केले असता, लोकसेवक निळकंठ खडके यांनी तक्रारदार यांना शासकीय दुचाकी वाहनावर बसवून आदर्शपार्कजवळ नेले आणि त्याच्याकडून लाचेची रक्कम 29 हजार रुपये स्वीकारली. त्यानंतर थोड्यावेळाने लोकसेवक खडके हे निजामपुरा पोलीस स्टेशन येथे आले असता त्यांना लाचलुचपत विरोधी पथकाचे कर्मचारी दिसले. खडके यांना पळून जात असताना पोलीस उपअधिक्षक विशाल जाधव यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. तरीही खडके यांनी जाधव यांना धक्का देऊन व दुखापत करून लाचेच्या रकमेसह पळून गेले.

खडके याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून आरोपी लोकसेवक (आलोसे) याचा शोध सुरू आहे. ठाणे एसीबी क्षेत्राचे पोलीस अधिक्षक सुनील लोखंडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक गजानन राठोड आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षक ठाणे परिक्षेत्र महेश तरडे या प्रकरणी मार्गदर्शन अधिकारी आहेत.