भिवंडी : तालुक्यातील सरवली एमआयडीसी येथील डायपर बनविणाऱ्या तळ अधिक तीन मजली कंपनीला मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.
या आगीत लाखोंच्या साहित्याचे नुकसान झाले असून आगीचे कारण अस्पष्ट आहे. दरम्यान सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. अथक प्रयत्नांनी आग विझवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कल्याण रोड सरवली एमआयडीसीतील सदाशिव प्रा. लि. नामक डायपर बनवणाऱ्या ‘हगीज’ कंपनीला भीषण आग लागली. पाहता पाहता आगीचे लोट हवेत पसरल्याने संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रात्रीची वेळ असल्याने कंपनीत कामगार नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. विशेष म्हणजे कंपनीत कापूस आणि प्लास्टिक कपड्याचा कच्चा माल साठवून ठेवल्याने तळ मजल्यावर लागलेली आग पसरत जाऊन संपूर्ण तीन मजली इमारत आगीने व्यापली गेली.
आगीची माहिती मिळताच भिवंडी, ठाणे, कल्याण येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना पाण्याच्या कमरतेमुळे सहा तासातही आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. तब्बल सात तासांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीच्या घटनेची नोंद कोनगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.