सहा ठिकाणी झाडे कोसळली
ठाणे: केवळ रात्री आणि पहाटे कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी मात्र दुपारीच दमदार हजेरी लावली. अवघे दोन तास पडलेल्या पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. या अवधीत ४८.५२ मिमी पावसाची नोंद झाली असून सहा ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
मंगळवारी सकाळी काही वेळ ऊन पडल्यानंतर १२ नंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर १५ ते २० मिनिटांतच पावसाने जोरदार हजेरी लावली. या दोन तासात आठ ठिकाणी पाणी साचल्याचे समोर आले आहे. दरम्यान या कालावधीत विविध 23 तक्रारी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षात नोंदविण्यात आल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.
जांभळी नाका येथील पेढ्या मारुती मंदिराजवळ, कॅडबरी जंक्शन येथील कोरम मॉलजवळ, ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या बाजूला, मुंब्रा-कौसा येथील सोमय्या स्कूल व कॉलेज, पांचपाखाडी, रमाबाई आंबेडकर नगर येथील निपुण हॉस्पिटलजवळ, गणेश वाडी सिद्धेश्वर तलावाजवळ, मखमली तलाव येथील के.पी. गांधी चाळीजवळ, सुमित्रा सोसायटीच्या बाजूला आणि कोर्टनाका परिसरातील जुना आरटीओ ऑफिसजवळ पाणी साचले होते.