जिल्ह्यातील २३ शाळा बंद
ठाणे : ठाणे जिल्ह्यात २४ अनधिकृत माध्यमिक शाळांपैकी २० शाळा या दिवा आणि मुंब्रा भागात आहेत. जिल्हा परिषदेने कारवाई केल्यानंतर २३ शाळा बंद करण्यात आल्या असून १८४० विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आल्याची माहिती माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात एकूण २४ माध्यमिक शाळा अनधिकृतपणे सुरू होत्या. त्यापैकी २३ शाळा बंद केल्या असून सद्यस्थितीत एक अनधिकृत शाळा सुरू आहे. या अनधिकृत शाळेवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक ललीता दहितुले यांनी केले आहे.
बंद करण्यात आलेल्या शाळांमध्ये स्टार इंग्लिश हायस्कुल-दिवा, डिवाईन ग्रेस हायस्कुल-वज्रेश्वरी, आर.एन. इंग्लिश स्कूल-कोन गाव, फरान इंग्लिश मिडीअम स्कुल गौरीपाडा-भिवंडी, आरंभ इंग्लिश स्कुल-गणेश नगर दिवा पूर्व, न्यु गुरुकुल कॉन्व्हेंट स्कुल श्लोकनगर दातिवली, ग्रीन व्हॅली कॉन्व्हेंट स्कुल- दिवा आगासन, एस. एस. इंग्लिश स्कुल बाबुराव रेसिडेंन्सी-दिवा, आर एल पी हायस्कुल-मुंब्रादेवी कॉलनी, आदर्श गुरुकुल स्कुल (इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या दोन शाळा)-दिवा, एसआरपी इंग्लिश स्कुल-वक्रतुंडनगर दिवा, ओमसाई इंग्लिश स्कुल-दातिवली रोड, श्री विद्याज्योती इंग्लिश स्कुल-मुंब्रादेवी कॉलनी, सिम्बॉयसिस स्कूल-सुंदरबन नगर दातिवली रोड, केम्ब्रीज इंग्लिश स्कूल-मुंब्रादेवी कॉलनी रोड, पब्लीक इंग्लिश स्कुल-गणेशपाडा दातिवली, आर्य गुरुकुल इंग्लिश स्कुल-दातिवली रोड, श्रीराम कृष्णा इंग्लिश स्कुल-दिवा दातिवली रोड, स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कुल मुंब्रा, जेडी इंग्लिश स्कुल-श्लोक नगर मुंब्रा आणि भारत इंग्लिश स्कुल-सिध्दीविनायक नगर दिवा या शाळांचा समावेश आहे. या शाळांच्या व्यवस्थापनांनी शाळा बंद केल्याचे हमीपत्र जिल्हा परिषदेला सादर केले आहे तर अल मुनीहाज सेकंडरी हायस्कुल, बेलापूर, नवी मुंबई ही अनधिकृत शाळा अद्याप सुरू असून त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती दहीतुले यांनी दिली.
बंद केलेल्या अनधिकृत शाळांमधील १८४० विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळांमध्ये करण्यात आले असून बंद केलेल्या शाळांमध्ये कोणीही प्रवेश घेऊ नये असे आवाहन श्रीमती दहितुले यांनी केले आहे.
पाच अनधिकृत प्राथमिक शाळा
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात पाच प्राथमिक शाळा अनधिकृतपणे सुरू होत्या. त्यापैकी एक शाळा बंद करण्यात आली असून सद्यस्थितीत त्यापैकी चार अनधिकृत शाळा सुरू आहेत. अनधिकृत सुरू असलेल्या चार शाळांना नोटीस बजावण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.