विद्यार्थ्यांच्या दाखले वाटपाला येणार वेग

राजेंद्र साप्ते यांची तहसील कार्यालयावर धडक

ठाणे : विविध कारणांमुळे रखडलेले दाखले वाटप आणि दलालांची चलती यामुळे विद्यार्थी आणि पालकांची ससेहोलपट होत होती. माजी उप महापौर राजेंद्र साप्ते यांनी याबाबत तहसीलदारांना भेटून आंदोलनाचा इशारा दिला. या प्रकरणी तातडीने दाखले वाटपाचा वेग वाढवून दलालांवर करावी करण्याचे आश्वासन तहसीलदार उमेश पाटील यांनी दिले.

निवडणुकीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या व्यस्ततेमुळे विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेज प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध प्रकारचे दाखले मिळण्यात अडचण निर्माण झाली होती. अशात तहसिलदार कार्यालय परिसरात असलेल्या दलालांच्या वावरामुळे सर्वसामान्य पालकांची फसवणूक होत होती. पालकांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिकेचे माजी उप महापौर राजेंद्र साप्ते यांनी तहसीलदार कार्यालयास धडक दिली.

विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले उत्पन्न, नॉन क्रिमिलियर, रहिवासी इत्यादी दाखल्यांसाठी लोकसभा निवडणुकीमुळे विलंब झाला आहे. तसेच दलालांमार्फत एक हजार ते चार हजार रुपयांपर्यंत रक्कम घेऊन आर्थिक लूट सुरू असल्याचे श्री.साप्ते यांनी पुराव्यानिशी तहसीलदार उमेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत तत्काळ कार्यवाही सुरू करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी पुढील तीन दिवसांत सर्व विद्यार्थ्यांचे दाखले देण्यात येतील, एकही विद्यार्थी दाखल्यापासून वंचित राहणार नाही तसेच येथील दलालांवर देखील गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.पाटील यांनी दिली.

यावेळी उपजिल्हाधिकारी ज्योती कांबळे (प्र) आणि नायब तहसीलदार दिनेश पैठणकर उपस्थित होते.