मोबाईल ॲपची सक्ती नको

मनपा शिक्षण विभागाचे शिक्षण संस्थांना निर्देश

नवी मुंबई : नवी मुंबईतील शिक्षण संस्थांनी शाळेतील सूचना तसेच इतर माहिती देण्यासाठी विशेष मोबाईल ॲप विकत घेण्याची सक्ती केली होती. याबाबतच्या तक्रारीनंतर नवी मुंबई शिक्षण विभागाने मोबाईल ॲपची सक्ती न करण्याचे निर्देश नवी मुंबईतील सर्व शाळांना दिले आहेत.

अनेक शाळा गणवेश, पुस्तके सहित इतर सुविधा घेण्यासाठी पालकांवर सक्ती करताना दिसत आहेत. त्यात आता नवी मुंबईतील काही शाळांनी मोबाईल ॲपची सक्ती केली होती. या ॲपची किंमत एक हजार रुपये होती. मात्र आज सूचना , माहिती देण्यासाठी समाज माध्यमातील इतर साधने उपलब्ध असताना मोबाईल ॲपची सक्ती का? असा सवाल करत नवी मुंबई आगरी सेना शहर प्रमुख दिनेश म्हात्रे यांनी विरोध केला. ही सक्ती रद्द करण्याची मागणी नवी मुंबई महानगर पालिका शिक्षण विभागाकडे केली होती. यावर मोबाईल ॲपचा वापर करणेसाठी पालकांना सक्ती न करण्याचे निर्देश नवी मुंबईतील सर्व माध्यमातील तसेच मनपा शाळांना नवी मुंबई महानगर पालिका शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांनी दिले आहेत.
—————————————-

शाळा, विद्यार्थीसंबंधी कोणतीही माहिती अथवा सुचना पालकांना कळविण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करण्यास पालकांना सक्ती करू नये. पालकांना सुचना द्यायची असल्यास शाळेच्या नोटीस बोर्डद्वारे किंवा वॉट्सॲप तसेच ई-मेल द्वारे कळविण्यात यावे. त्यामुळे कोणत्याही शाळांनी मोबाईल ॲपचा वापर करण्यास पालकांना सक्ती केली किंवा पालकांची तक्रार या विभागास प्राप्त झाली तर त्या शाळेवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी स्पष्ट केले.