मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
या निवडणुकीकरिता उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज सोमवार, १० जून २०२४ रोजी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघात १०, कोकण विभाग पदवीधर २५, नाशिक विभाग शिक्षक ३६ तर मुंबई शिक्षक मतदारसंघात १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, १२ जून २०२४ अशी आहे. बुधवार २६ जून २०२४ रोजी चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया ५ जूलै २०२४ रोजी पूर्ण होणार आहे.