चारही शाखांसाठी १,४०,९१० जागा
ठाणे : नुकत्याच झालेल्या दहावी शालांत परीक्षेत ठाणे जिल्ह्यातील एक लाख ८,३७८ मुले उत्तीर्ण झाली असून अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील कनिष्ठ आणि उच्च महाविद्यालयांमध्ये चारही शाखांसाठी एक लाख ४०, ९१० जागा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.
दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर ११वी च्या प्रवेशाची चिंता पालक आणि विद्यार्थ्यांना भेडसावत असते. ९० टक्क्यांपुढे गुण मिळवणारे विद्यार्थी मुंबईतील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, भाईंदर अशा महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अनेक कॉलेज सुरू झाले असून अनेक महाविद्यालये शैक्षणिक दर्जा, सोयी-सुविधा आदी बाबत मुंबईतील महाविद्यालयांशी स्पर्धा करू लागली आहेत. यंदा दहावीत उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी या कनिष्ठ महाविद्यालय आणि महाविद्यालयांनी ११वी साठी पुरेशा जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.
कला शाखेसाठी २१,४२० जागा उपलब्ध असून वाणिज्य ६६,९८०, विज्ञान ५१,५८० तर एचएसव्हीसी शाखेकरिता ९३० जागा उपलब्ध आहेत. या एक लाख ४०,९१० जागांपैकी ४९,२३० जागा या व आरक्षित असून ९१,६८० जागा या ऑनलाईन प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यात व्यवस्थापनाच्या कला शाखेच्या ९४९, वाणिज्य ३,११०, विज्ञान २,४४२ आणि एचएसव्हीसीच्या ४१ जागा आहेत. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ३२,६५५ जागा असून यात कला ४००५, वाणिज्य १६,३५५, विज्ञान १२,२०० आणि एचएसव्हीसी शाखेच्या ९५ जागांचा समावेश आहे. तर इन हाऊस जागांमध्ये कला शाखेच्या १,६२१, वाणिज्य ४,७७३, विज्ञान ३,५४६ आणि एचएसव्हीसीच्या ९३ जागा आरक्षित आहेत.
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षांकरिता घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत ठाणे जिल्ह्यातील एकूण एक लाख ८,३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ५४,५९८ मुलगे तर ५३,७८० मुलींचा समावेश आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीच्या ३२, ५३२ जागा अधिक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अकरावी प्रवेशापासून वंचित एकही विद्यार्थी वंचित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.