सुख – दुःख हा लपंडावाचा खेळच !

आपल्या मनाला, शरीराला ज्याने आनंद व सुख मिळते. जे नेहमीच आपल्याला सर्वांना हवेसे वाटत असते व ज्यामुळे आपले मन नेहमीच आनंदी उत्साहित होत असते. मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात, ह्या सार्‍या गोष्टी म्हणजे सुख म्हणता येईल. पण ह्या संकल्पनेच्या अगदी उलट म्हणजे अत्यंत क्लेशकारक, त्रासदायक, मनाला त्रागा करणारे, नकोसे वाटणारे ,लवकर संपावे असे वाटूनही प्रदीर्घ काळ टिकणारे, मन दुःखी करणारे,व चीड चीड करणारे म्हणजे दुःख असे म्हणता येईल. वास्तविक सुखदुःखाच्या या संकल्पना असून आपल्या सांप्रत जीवनाचे ते अतूट नाते आहे .पण आपली मानसिकताच ते  स्वीकारणारी नसल्याने आम्हाला तसे वाटत राहते इतकेच. खरे पाहिले तर हे वास्तव आहे .दुःख मोठ्या प्रमाणात असून ते भोगल्याशिवाय सुखाचा आनंद घेता येत नाही. म्हटले आहे .
‘’ सुख असे जवा एवढे ,दु;ख असे पर्वता एवढे ‘’ हे संत तुकारामांनी म्हटले आहे. दुःखाची रात्र सरल्याशिवाय सुखाची पहाट उगवत नाही ,इतके  सुखदुःखाचे अतूट संबंध आहेत .सुखदुःख हे विहिरीतील रहाट   गाडगे सारखे आहेत. छोट्या मडक्यांची  माळ विहिरीतील रहाटा वर  बांधलेली असते.रहाट  गोलाकार फिरून विहिरीतील पाणी वर आणून परत रिकामी झालेली मडकी विहिरीतील पाणी भरण्यासाठी जातात.जीवन म्हणजे विहिरीतील माळे सारखीच  आहे.सुख दु;खाचे रूपक त्यास एकदम चपखल  बसते.
निसर्गाची रचनाच अशी आहे की जगात पूर्ण सुखी किंवा पूर्ण दु;खी  असा कोणी नसतो. सुखदुःख हे लपंडावाच्या  खेळाप्रमाणे एका पाठोपाठ मागे पुढे धावत असतात,  फरक इतकाच की प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार सुखदुःख कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाला भोगायला  लागते इतकेच .समर्थ रामदास स्वामींचा तर प्रसिद्ध श्लोकच त्याची उकल करून जातो ‘’जगी सर्व सुखी  असा कोण आहे, विचारी मना तुच शोधूनी पाहे ,मना त्वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. ‘’हे विचारीमना,  तूच जगात सर्व सुखी असा कुणी दिसतो का पहा बरे?  हाच प्रश्न भगवान बुद्धानी विचारला होता.त्याचे असे झाले की एक दु;खी विधवा स्त्री त्यांच्याकडे आली व तिने आपली विवंचना मांडली.ज्यांच्या घरी कोणतेही दुःख नाही अश्या घरातून अक्षता आणण्यास सांगितले.त्या विधवा स्त्रीस साहजिकच प्रश्नाचे उत्तर मिळाले.  प्रत्येकाच्या पूर्व संचितानुसार त्या जीवास कर्मभोग भोगावे लागतात, त्यानुसार सुख वा दु;ख त्या जीवाच्या पाठीशी लागते.त्यापासून त्याची कुणीही सुटका करु ,शकत नाही, हे कडवे सत्य आहे.
सुखाचे दिवस असताना सारेच वातावरण अनुकूल असल्याने माणसाची भूक वाढत जाते, त्याची अतिरेकी भूक  वाढतच जाते, हे दुःखाचे मोठे कारण बनते ,पण ते त्याच्या कधी लक्षातच कधी येत नाही. त्याची अतिरेकी हावच  त्याला अखेर गोत्यांत आणीत असते. त्यासाठी अत्यंत उपयुक्त उदाहरण देता येईल. प्रथम आपल्याकडे सायकल असली  त र त्यानंतर स्कूटर ,चार चाकी गाडी घरी येते.त्याच प्रमाणे प्रथम असलेल्या छोट्याश्या घरानंतर बंगल्याची स्वप्ने  पाहतो.माणसाने स्वप्ने जरूर पहावीत ती पूर्ण देखील करावीत.पण तसे करीत असताना बरेच वेळा कुकर्माचा अवलंब केला जातो.त्या विचाराची  भुते आपली  झोपेत देखील पाठ सोडीत नाहीत.त्याचे प्रत्यंतर आरोग्य बिघडण्यात होते..
आपले मन सतत चिंतेने ग्रस्त होते”.चिता व चिंता “ह्या दोन शब्दात फक्त एका अनुस्वराचाच फरक आहे. एखादी चिंता माणसाचे मन सतत पोखरत जाते.आणि चिता मृतदेहाला फक्त एकदाच भस्मसात करून टाकते.चिंताग्रस्त माणूस अखेर मोठ्या व्याधीचा शिकार बनतो.थोडक्यात अतिरेकी सुख हेच दु;खाचे प्रमुख कारण बनते. संत कबीर जी नी आपल्या दो ह्यात हेच म्हंटले आहे.’दु;ख्मे सुमिरन सब कारे, सुखमे ना कारे कोई,सुखमे सुमिरन करे तो दुख काहे को होई, म्हणूनच वाईट काळासोबत चांगल्या काळात देखील ईश्वराचे स्मरण करीत जावे.सततच्या ईश्वर स्मरणाने मनात येणारे कुविचार जाऊन विवेकीवृत्ती बळावेल. . सोबत विवेकी विचार व कृती संभाव्य दुःखापासून सदैव दूरच ठेवील.महाभारतामधील त्यासाठीचा  संदर्भ फारच बोलका आहे. एकदा भगवान श्री कृष्णाने आपल्या आत्येस म्हणजे  कुंतीस वर मागण्याससांगितले.तेव्हा तिने फक्त त्याचेकडे दु;खच मागितले. कारण दु;खातच सतत तिला भगवंताची आठवण राहील. त्यामुळे तरी तो सदैव तिच्याजवळच राहील.ह्या तिच्या मागण्याचा फार मोठा गुढार्थ भरून राहिला आहे.तिने दु;खातच सुख मानले आहे
.वास्तविक सुख व दु;ख  ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.त्यामुळे सुख दु;खाचा लपंडाव जीवनभर चालूच राहणार आहे. दु;खात सुख मानून जीवन प्रवास चालविणे हाच खरा पुरुषार्थ आहे. आणि हा पुरुषार्थ  सदैव विवेकाच्या जपनुकीनेच  वर्धित होतो.  समाजातील वरच्या घटकाकडे सतत पाहून दु;खी होण्यापेक्षा खालच्या घटकाकडे पहिले तर नक्कीच आपल्याला दु;ख होणार नाही.तोच विवेक जीवनात असणे महत्वाचा आहे. अपघातात जखमी झालेला रुग्ण रुग्णालयात दाखल होतो.त्यावेळी तो फार चिंताग्रस्त असतो. अपघातात आपण एखादा अवयव गमावून बसलो  नाही.त्यापेक्षाअधिक आनंद कोणता असणार आहे ? सकारार्थी विचार दु;खात बरीच उभारी देणारा नक्कीच आहे.  जीवन जगताना सकारार्थी  विचार केवळ ईश्वरी चिंतनातून मिळत असत.  त्यामुळे आपले जीवन सुसह्य व सुखी बनू शकते. मन जर विचार व आचरणाने शुद्ध व स्वच्छ असले तरच सर्वत्र खऱ्या अर्थाने निर्भेळ आनंद मिळू शकतो. त्यासाठी मनातून  षडरिपू रुपी जळमटे  सतत काढून टाकावी लागतात. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून हेच सांगितले आहे की “आनंदाचे डोही, आनंद तरंग”

रामकृष्ण विनायक अभ्यंकर ,

2/४६ भक्तियोग सोसा.परांजपे नगर,

वजीरा  नाका, बोरीवली प.

मुंबई ४०००९१

मोबा.९८१९८४४७१०