जिभेपासून मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया

सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांची कामगिरी

ठाणे : मौखिक कर्करोग झाल्यावर एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयात अथवा मुंबईत टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागते. शस्त्रक्रियेचा खर्चही न परवडणारा असतो. मात्र ठाणे सिव्हील रुग्णालयात एका महिलेच्या जीभ आणि मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मुंबईत रहाणाऱ्या सरिता (नाव बदललेले) या ५८ वर्षाच्या महिलेची जीभ गेल्या अनेक दिवसांपासून जाड झाली होती. बोलताना, जेवताना भरपूर त्रास होत होता. दरम्यान जिभेचे निदान करण्यासाठी एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली, असता सरिता यांना जीभेचा कर्करोग झाला असल्याचे निष्पन्न झाले. उपचारासाठी होणारा खर्च साधारण अडीच ते तीन लाख रुपये सांगण्यात आला.

आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने जीभेवरील कर्करोगाचे उपचार करायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला. सिव्हील रुग्णालयात उपचार होत असल्याचे त्यांना कळल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरिता यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती दंत शल्य चिकीत्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिली.

प्रथम सरिता याची सर्व रक्त चाचणी आणि त्यानंतर शारीरिक स्वास्थ्य याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली गेली. सरिता यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता. त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑनको सर्जन डॉ.हितेश सिंघवी यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार, डॉ. रुपाली यादव, डॉ. संकेत शिंदे आदींनी यशस्वी केली.

खाजगी रुग्णालयात मौखिक कर्करोगावर उपचार घेणे सर्वांना परवडणार नसत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक कर्करोगीना मुंबईतील टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. मात्र सिव्हील रुग्णालयात मौखिक कर्करोगाच्या छोट्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत. यासाठी खाजगी कर्करोग तज्ज्ञ बोलावून शस्त्रक्रिया केल्या जातात., अशी माहिती डॉ. कैलास पवार यांनी दिली.

तंबाखू मशेरी लावण्याच्या सवयीमुळे या महिलेला मौखिक कर्करोग झाला असावा. तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दंत विभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना मौखिक कर्करोग या विषयी माहिती दिली जाते. गेल्या वर्षभरात १५ हजारावर नागरिकांचे मौखिक कर्करोग विषयी समुपदेशन करून तपासणी करण्यात आल्याचे डॉ. अर्चना पवार यांनी सांगितले.