क्विनोआ बेल पेपर कबाब

साहित्य :
तूप 10 मि.ली,
२ काळी वेलची,
धणे 5 ग्रॅम,
काळे जिरे ५ ग्रॅम,
आले – चिरून ५ ग्रॅम,
१ तमालपत्र,
भिजवलेली चणाडाळ 200 ग्रॅम,
पिवळी मिरची पावडर ५ ग्रॅम, हळद पावडर 3 ग्रॅम,
क्विनोआ 400 ग्रॅम,
मीठ 10 ग्रॅम,
भाजलेले बेसन १५ ग्रॅम,
तळण्यासाठी तूप,
चिरलेली ढोबळी मिरची ५० ग्रॅम

कृती :
कढईत तूप गरम करून त्यात धणे, काळे जिरे घालून तडतडू द्या. नंतर आले, तमालपत्र घालून पारदर्शक होईपर्यंत परतावे. आता त्यात चणाडाळ घाला आणि २ मिनिटे परतून घ्या. मग त्यात हळद, पिवळी मिरची पावडर, उकळवून घेतलेला क्विनोआ, मीठ हे सर्वकाही व्यवस्थित मिसळा, झाकण ठेवून 5-10 मिनिटे शिजवा.
गॅस बंद करा आणि थोडे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. नंतर ग्राइंडरच्या भांड्यात घाला आणि बारीक पेस्ट करा. हे एका भांड्यात काढा.
एका कढईत ढोबळी मिरची परतून घ्या आणि त्यात थोडे भाजलेले बेसन घालून व्यवस्थित मिक्स करा. आता क्विनोआ मिश्रणाचा एक छोटासा भाग हाताने सपाट करून घ्या आणि त्यात एक छोटा चमचा सिमला मिरचीचे सारण घाला आणि टिक्कीसारखा आकार देऊन बंद करा.
नंतर कढईत थोडं तूप गरम करून हे कबाब मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करा. चटणीबरोबर सर्व्ह करून आस्वाद घ्या.

टीप : 1-तुम्हाला क्विनोआ आवडत नसल्यास कोणत्याही प्रकारचे मिलेट वापरू शकता.
२- जर कबाब नीट होत नसेल तर बटाटा थोड्या प्रमाणात मॅश करून घाला.
३- अधिक चटपटीत स्वादासाठी कबाबमध्ये बारीक चिरलेली मिरची घाला.

आशुतोष मिश्रा

एक्सिक्युटिव्ह सूस शेफ

फॉर्च्युन पार्क लेकसिटी, ठाणे