पुण्यातील राजकीय हितसंबंध उघड होऊ नये म्हणून…

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ठाणे: पुण्यातील राजकीय हितसंबंध उघड होऊ नयेत याकरता माझ्या प्रकरणाला वळण दिले जात आहे, असा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

पोर्शे, तावरे, मनु ही सर्व प्रकरणे मागे टाकायला हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचे आव्हाड यांनी सांगितले, मात्र हे सर्व मुद्दे आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये उचलून धरणार असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे सर्व आरोप केले आहेत. भाजपा हा माझा वैचारिक शत्रू आहे. ⁠मनुस्मृती आणि धर्म, जातीपातीच्या राजकारणावरुन माझे भाजपाशी वैमनस्य असल्याचे ते म्हणाले. मनु मला मान्य नाही. ⁠माझ्या हातून जे घडले त्याबाबत मी माफी मागितली असल्याचे आव्हाड म्हणाले. ज्योतीबा फुले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर कोशियारींनी माफी मागितली होती का?, चंद्रकांत पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केले होते, त्यावेळी त्यांनी माफी मागितली होती का? असे प्रश्न देखील त्यांनी भाजपला केले.

मला फाशी द्या. मी सनातनी आणि मनु वादाच्या विरोधात उभा राहणारच. मनुस्मृतीत स्त्रीचा अनादर करतात. छगन भुजबळ म्हणाले याचा मला आनंद आहे. ⁠९७ वर्षांनंतर त्यास्थळी मनुस्मृती जाळली गेली. दलित समाजातले अनेक नेते माझ्याबद्दल चांगले बोलले. आमच्यावर गुन्हे दाखल झालेत, आम्ही आणखी मनुस्मृती जाळणार असे आव्हाड यांनी सांगितले.