ठाणे परिवहन सेवेच्या ५० तर राज्य परिवहनच्या २४ गाड्या
ठाणे : आज गुरूवारी मध्यरात्री साडेबारा वाजेनंतर ठाणे स्थानकात सुरू होणाऱ्या ६३ तासांच्या महा मेगा ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत, मात्र एसटी आणि टीएमटीने बससेवा उपलब्ध केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्र.५ आणि ६ च्या रुंदीकरणासाठी रेल्वे प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्रीपासून ६३ तासांचा जंबो मेगा ब्लॉक घेतला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने स्थानिक परिवहन सेवांना अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत ५० बस ठाणे-मुलुंड आणि ठाणे-दिवा या मार्गावर उपलब्ध करून दिल्या आहेत.
दुसरीकडे राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने मुंबईतील कुर्ला नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकांमधून ठाणेसाठी ५० जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई आगारातील २६ आणि ठाणे आगारातून २४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रवाशांची प्रचंड मागणी लक्षात घेता यात आवश्यकतेनूसार वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांना मार्गदर्शनासाठी ठाणे आणि मुंबई आगारांमध्ये अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने दिली.