आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
ठाणे : जितेंद्र आव्हाड हे दर दोन महिन्यांनी माफी मागत असतात, पण यावेळी त्यांनी केली चूक गंभीर असून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी आज ठाण्यातील आंदोलनात केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपाने ठाण्यात चार ठिकाणी तीव्र आंदोलन करून आव्हाडांचा पुतळा जाळला. तसेच त्यांच्या छायाचित्राला काळे फासले. आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नियोजनातून ठाण्यातील कोर्ट नाका, कळवा, भीमनगर आणि कोपरीत झालेल्या आंदोलनात आव्हाडांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच चितळसर पोलिस ठाणे व वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेच्या माध्यमातून समस्त भारतीयांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला. ते आमचे दैवत असून त्यांचा अपमान आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आ.केळकर यांनी केली. ठाण्यातील कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात आमदार संजय केळकर यांच्यासह ठाणे शहर विधानसभा निवडणूक प्रमुख सुभाष काळे, माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर, माजी नगरसेविका नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनिल हंडोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, राजेश मढवी, विक्रम भोईर, महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सामील झाले होते.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर येथे झालेल्या आंदोलनात आव्हाडांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. त्यानंतर भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष आनंद बनकर यांनी वर्तकनगर पोलिसांना निवेदन देऊन आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या आंदोलनात महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, भाजयुमोचे शहराध्यक्ष सुरज दळवी, वर्तकनगर मंडल अध्यक्ष संतोष जायसवाल, लोकमान्य नगर मंडल अध्यक्ष निलेश पाटील, बाळा केंद्रे, राम ठाकूर, वीरसिंह पारछा आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात विधानसभा मतदारसंघाचे सहप्रभारी भरत चव्हाण, माजी नगरसेवक सुरेश कांबळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. समीरा भारती, सहसंयोजक कृष्णा भुजबळ, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, वागळे मंडल अध्यक्ष सचिन सावंत, इंदिरानगर मंडल अध्यक्ष दयाशंकर यादव यांच्यासह कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला. त्यानंतर सुरेश कांबळे यांनी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात निवेदन देऊन आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर कळवा येथे भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, मंडल अध्यक्ष सुदर्शन साळवी, सोहेल शेख, हिरोज कपोते यांनी आंदोलन करून आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.