ठाणे : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनचे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीकडून मान्यता मिळाली आहे. या अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्पुटर इंजिनीरिंग, इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन शाखांचा समावेश आहे.
नव्याने सुरु होत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चार इमारतींचा यामध्ये समावेश आहे. या इमारतींमध्ये आवश्यक त्या वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्नित विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनाने दर्जेदार पदविका शिक्षणाची ४० वर्षे पूर्ण केली आहेत. ठाणे शहराला जाणवत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज लक्षात घेऊन विद्या प्रसारक मंडळाने २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षापासून आपल्या तंत्रनिकेतनाचे रुपांतर अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यांसदर्भात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांची मान्यता मिळाली आहे.
विद्या प्रसारक मंडळच्या गुणवत्तापूर्ण व अद्ययावत तंत्रशिक्षण देण्याच्या प्रयत्नांमुळेच तंत्रनिकेतनाला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडीटेशन, नवी दिल्ली या संस्थेने सन २००४, २०१७, २०१९ आणि २०२३ (३० जून २०२६ पर्यंत वैध) मान्यता दिली आहे. संस्थेला 2009 आणि 2015 मध्ये “सर्वोत्कृष्ट तंत्रनिकेतनासाठी असलेला आयएसटीई नरसी मोंजी पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याचप्रमाणे २००९, २०१७ आणि २०२० मध्ये महाराष्ट्र-गोवा विभागातील आयएसटीई सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चॅप्टर पुरस्कार देखील मिळाला आहे. इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम प्रोग्रामच्या दोन प्रयोगशाळांना २०१५ आणि २०१६ साठी एमएसबीटीई “सर्वोत्कृष्ट प्रयोगशाळा पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईने ५० संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनाची निवड केली होती. तंत्रनिकेतनाला २००५ आणि २०२२ मध्ये IoT प्रयोगशाळा आणि पॉवर सिस्टीम प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी एआयसीटीई समर्थित मॉडरोब्ज (मॉडर्नायझेशन आणि रिमूव्हल ऑफ ऑब्सोलसेन्स) अनुदान मिळाले आहे.
१९३५ साली स्थापन झालेल्या विद्या प्रसारक मंडळाच्या विविध शाखांमधून दरवर्षी १८ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी विद्या प्रसारक मंडळ नेहमीच कटिबद्ध राहील, अशी हमी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी दिली.
इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी संस्थेला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.