भिवंडीत भाजपाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन

भिवंडी : मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या विरोधात महाड येथे आंदोलन करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आंदोलन करताना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला. त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण राज्यात जितेंद्र आव्हाड यांचे विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला.

आज सकाळी भिवंडी शहरात भाजपा शहराध्यक्ष ॲड.हर्षल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शहर कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करीत आपला संताप व्यक्त केला आहे. या आंदोलनात आमदार महेश चौगुले, माजी शहराध्यक्ष संतोष शेट्टी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष शाम भोईर,.शहर सरचिटणीस राजू गाजंगी, निष्काम भैरी, कल्पना शर्मा यांसह अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य हे फक्त निषेधार्ह नसून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष हर्षल पाटील यांनी केली. निवडणूक काळात बाबासाहेबांच्या नावाचा उदोउदो करीत संविधान रक्षणाच्या बाता करून सर्वसामान्यांच्या मनात विष कालवण्याचे काम करणारे जितेंद्र आव्हाड यांच्या या दुष्कृत्यानंतर गप्प का असा सवाल काँग्रेस व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाटील यांनी विचारला आहे.