यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक पावसाची शक्यता

१० जूनला मान्सून मुंबईत येणार

मुंबई : रेमल वादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग आला असून लवकरच मान्सून महाराष्ट्रत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या 10 किंवा 11 जूनला मुंबईत पावसाची सुरुवात होणार असून 15 जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

दरम्यान महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकीकडे केरळमध्ये मान्सूनची चाहूल लागली असताना महाराष्ट्रासह उत्तर भारतात उन्हाचा तडाखा जाणवतोय. रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग आला आहे. त्यामुळे आगामी 2-3 दिवसांत मान्सून केरळमध्ये प्रवेश करण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांची होरपळ होत आहे. हवामान खात्यानं पुढील एक ते दोन दिवस विदर्भात तापमान वाढीची शक्यता वर्तवली आहे. या काळात कमाल तापमान 44 ते 49 अंशापर्यंत वाढण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्य सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशाच्या आसपासच्या भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, 29 मे पासून एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार आहे, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि गारपिटी देखील होऊ शकते, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांनंतर पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.