ठाण्यातील पब्ज-डान्सबार पोलिसांच्या रडारवर

ठाणे महापालिका कधी होणार जागी?

ठाणे : पुण्यातील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणानंतर ठाण्यातील पोलीस यंत्रणा सावध झाली असून सर्व बार-रेस्टॉरन्ट, डान्स बार, पब्ज आणि हुक्का पार्लरची तातडीने झाडाझडती घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. दरम्यान अनेक तक्रारीनंतरही बेकायदा हुक्का पार्लर, पब्ज, डान्सबार यावर कारवाई करण्यास ठाणे महापालिका चालढकल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाणे शहर, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण आणि वागळे परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाले आहे. त्यामुळे या भागांत अवैध व्यवसायांना चांगले दिवस आले आहेत. ठाण्यातील वसंत विहार येथिल कोठारी कापाउंड येथे बेकायदेशीर पब आणि हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणावर सुरू असून रात्रीच्या वेळी तरुणाई मोठ्या संख्येने येथील पब, बार आणि हुक्का पार्लरमध्ये जाते. कमी वयाची मुले देखिल सर्रासपणे नशेचा झुरका घेण्यासाठी जातात. त्यांना तेथे कोणतेही बंधन राहिलेले नाही. या बेकायदेशीर व्यवसायांवर ठोस कारवाई करावी, नवीन पिढीला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी पालिका, पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला तसेच अधिवेशनातही आवाज उठवला. जागर फाउंडेशन या संस्थेने कोठारी कंपाऊंड येथील या बेकायदा व्यवसायांवर कारवाई करण्याची वर्तकनगर प्रभाग समितीकडे लेखी मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला, परंतु अधिकाऱ्यांनी चालढकल करत या व्यवसायांना पाठीशी घालण्याचेच काम केल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे लेडीज बार आणि ढाब्यांवर मोठ्या प्रमाणावर मद्य विक्री केली जात आहे. घोडबंदरनंतर कशेळी, काल्हेर, कल्याण शिळफाटा, उल्हासनगरमध्येही तिच परिस्थिती आहे. पोलिसांच्या आशिर्वादामुळे हे सर्व सुरु असल्याचा आरोप जागरूक ठाणेकर करत आहेत.

पुण्यातील दुर्घटनेनंतर मात्र ठाण्यातील पोलीस सावध झाले आहेत. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अनधिकृत तसेच रात्री उशीरापर्यंत चालणार्‍या सर्व हॉटेल, पब्जवर कारवाई करण्याची सक्त सुचना दिली आहे. यामध्ये कुणी पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी ‘अर्थपूर्ण’ मदत करताना दिसला तर त्यावर कठोर कारवाई करण्याची तंबीही त्यांनी दिली आहे.

सर्व नियम धाब्यावर बसवून चालणार्‍या पब्ज, डान्स बारवाल्यांकडून दिवसाला ५० ते ७५ हजार रुपयांचा हप्ता पोलिसांना जातो. त्यासाठी अधिकार्‍यांचे काही विश्वासू ‘कलेक्टर’ खास रात्रपाळीवर असतात. अशा ‘कलेक्टर’ अधिकारी, कर्मचार्‍यांची यादी बनवण्याचे कामही सुरू असल्याचे समजते.