३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचा आयुक्तांचा निर्धार

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात नाले सफाईची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला.

मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात प्रथम आनंदनगर येथील नाले सफाईचे काम आयुक्त राव यांनी पाहिले. या नाल्याचा काही भाग मुंबई महापालिका हद्दीत आहे. त्यांच्याशी समन्वय साधून येथील सफाईचे काम होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यांनतर, रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या, ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे असलेल्या नाल्याची सफाईचे काम आयुक्त यांनी पाहिले. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला आहे. रेल्वे मार्गाखाली असलेल्या भागातून सफाई करणे आव्हानात्मक असले तरी ते काम व्यवस्थित केले जावे, अशी सूचना यावेळी आयुक्त राव यांनी दिली.

वर्तकनगर येथील दोस्ती शेजारील नाला, महात्मा फुले नगर येथील नाला आणि कोरम मॉल लगतचा नाला यांची पाहणी आयुक्त राव यांनी केली. कोरम मॉल लगतच्या नाल्याची मोठा भाग पूर्व द्रुतगती महामार्ग येथे जोडला जातो. तेथेही व्यवस्थित सफाई केली जाईल यांची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उप नगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी आदी अधिकारी उपस्थित होते.